आनंद शर्मा/श्रेयस होले ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काँग्रेस सत्तेत आल्यास ‘आर्म्ड फोर्सेस स्पेशल पॉवर्स अॅक्ट’ (एस्पा) कायदा रद्द करणार नाही, तर त्याचा दुरुपयोग रोखणार आहे, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनी स्पष्ट केले. भाजपला हा मुद्दा उचलण्याचा कुठलाही अधिकार नाही. कारण, भाजपाने स्वत:च तीन राज्यातून एस्पा कायदा हटवलेला आहे आणि निवडणुकीनंतर अरुणाचल प्रदेशातूनही हा कायदा हटविण्याचे आश्वासन देत आहे, असेही त्यांनी सांगितले.लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी रविवारी ते नागपुरात आले त्यांनी ‘ लोकमत’शी विशेष बातचित केली. यावेळी खरगे यांनी ‘काँग्रेस क्रॉस होल्डिंग आॅफ मीडिया व्यवस्थेलाही संपवणार असल्याचे सांगितले. देशद्रोहाच्या कायद्याबाबत पक्षाचे धोरण स्पष्ट करताना ते म्हणाले, या कायद्याच्या नावावर अनावश्यक पद्धतीने लोकांना त्रस्त केले जात आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य आहे. परंतु त्यांच्यावर दबाव टाकून त्यांचे स्वातंत्र्य संपवण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही. काँग्रेसला देशद्रोहाच्या कायद्याचा चुकीच्या वापराबद्दल आक्षेप आहे. मोदी सरकार स्वत:ला प्रामाणिक आणि दुसऱ्यांना चोर, देशद्रोही मानत आहे. ही मानसिकता योग्य नाही. राष्ट्रवादाच्या नावावर देशद्रोह कायद्याचा चुकीचा वापर होऊ नये. काँग्रेस पक्ष देशद्रोह कायद्यासंदर्भात अधिक स्पष्टता आणू इच्छिते, कायदा बदलवण्याचा विचार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
तुष्टीकरण नाही, शिक्षणावर भरकाँग्रेस तुष्टीकरणाचे राजकारण करीत नाही. पक्षाने जीडीपीच्या सहा टक्के रक्कम शिक्षणासाठी राखीव ठेवली आहे. पहिली ते दहावी पर्यंत मोफत शिक्षण, नरेगा, फूड सेफ्टी अॅक्ट हे सर्व काही कोणत्याही एका वर्गासाठी नाही. या योजना सर्वांसाठीच आहे. याउलट मोदी सरकारने सिंचन, सामाजिक न्याय व संरक्षण क्षेत्राच्या बजेटमध्ये मोठी कपात केली आहे. काँग्रेसने आणलेल्या योजनांची नावे बदलून त्या आपल्या योजना असल्याचे सांगणे सुरू आहे, अशी टीका खरगे यांनी केली.
‘प्रेस’च्या स्वातंत्र्याची गरजखरगे म्हणाले, मीडियाचे ‘कॉर्पोरेटाइजेशन’ करण्यात आले आहे. या क्षेत्रात एकाधिकार व पुंजीवाद फोफावत आहे. हे सर्व थांबवून प्रेसचे स्वातंत्र्य अबाधित राखणे आवश्यक आहे. यासाठीच काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात नवी मीडिया पॉलिसी बनविण्यावर भर दिला आहे. याद्वारे ‘मीडिया’मध्ये क्रॉस होल्डिंग आॅफ मीडियाला रोखले आहे.
महाराष्ट्रात आघाडी पहिल्या क्रमांकावरलोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसची कामगिरी कशी राहील याबाबत खरगे म्हणाले, २०१४ नंतर नोटबंदी, जीएसटी आणि बेरोजगारीने लोक त्रासले आहे. विदर्भात शेतकरी त्रासले आहेत. केंद्र आणि महाराष्ट्रात भाजपचे सरकार असूनही समस्या सुटलेली नाही. मोदी सरकारने २०१४ मध्ये दिलेली आश्वासने पूर्ण केलेली नाहीत. यामुळे लोक पुन्हा काँग्रेसकडे वळत आहेत. काँग्रेस पक्ष निवडणुकीमध्ये पूर्ण परिश्रम घेत आहे. याचे चांगले परिणाम दिसून येतील. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात पक्षाच्या जागा वाढतील आणि आणि काँग्रेस-राकाँ आघाडी पहिल्या क्रमांकावर राहील, असा दावाही त्यांनी केला.