लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उमेदवारी जाहीर होण्यापासून ते उमेदवारी अर्ज सादर करेपर्यंत काँग्रेससाठी रामटेक मतदार संघ डोकेदुखीचा विषय ठरला आहे. आता निवडणुकीला केवळ ९ दिवसाचा कालावधी शिल्लक असताना कॉँग्रेसचे उमेदवार किशोर गजभिये यांची प्रचार यंत्रणा तालुका पातळीवरील कार्यकर्त्यापर्यंत पोहोचली नसल्याने गजभिये खरच रामटेकच्या मैदानात आहेत का, असा सवाल सामान्य काँग्रेस कार्यकर्ते करू लागले आहेत.युतीच्या उमेदवाराचा प्रचाराचा पहिला टप्पा संपला असला तरी गजभिये यांचे साधे बॅनर्स व पोस्टर्स गावात आले नसल्याने प्रचार कसा करायचा यामुळे काँग्रेस कार्यकर्ते हताश झाले आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी आणि प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण गावागावात काँग्रेस पोहोचवा असे सांगतात. मात्र येथे तर काँग्रेसचा उमेदवार अजूनही गावात पोहचला नाही. त्यामुळे प्रचार कसा करायचा अशी खंत कळमेश्वर तालुक्यातील काँग्रेसच्या एका निष्ठावंत कार्यकर्त्याने व्यक्त केली. गजभिये यांच्यासाठी काँग्रेस आणि रामटेक नवे आहे. काँग्रेसच्या ज्या नेत्यामागे जनाधार नाही ते त्यांच्यासोबत फिरतायेत. पी.व्ही.नरसिंहराव रामटेकमधून लढले होते. तो काळ वेगळा होता. आता मतदारांना सहज उपलब्ध होणारा आणि त्यांच्या समस्या समजून घेणारा उमेदवार हवा आहे. काँग्रेसची उमेदवारी मिळाली म्हणजे निवडणूक जिंकलो या संभ्रमात गजभिये असतील तर तो त्यांचा चुकीचा समज आहे. आता मतदारांना उमेदवार कोण आहे ? तो मतदार संघासाठी काय करणार आहे ? त्याचे व्हीजन काय आहे ? या गोष्टीत रस आहे. त्यामुळे गजभिये यांची प्रचार यंत्रणा जर कार्यकर्त्यापर्यंच पोहोचली नसेल तर ती मतदारापर्यंत कधी पोहोचणार असा सवाल भिवापूर येथील काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला आहे. २५ मार्च रोजी उमेदवारी अर्ज सादर करताना गजभिये यांनी त्यांच्या उमेदवारीला काँग्रेसमधील काही नेत्यांचा विरोध अनुभवला होता. यानंतर चित्र बदलेल असे वाटत होते. मात्र वास्तव वेगळेच आहे.गजभिये यांना हायजॅक केले!किशोर गजभिये हे काँग्रेसचे उमेदवार असले तरी उमेदवारी जाहीर झाल्यापासून जिल्ह्यातील एका काँग्रेस नेत्याने त्यांना हायजॅक केल्याचा आरोप कार्यकर्त्यांकडून होऊ लागला आहे. ज्यांची मतदार संघात ताकद नाही त्यांच्यासोबत जर गजभिये फिरत असतील तर रामटेकमध्ये काँग्रेसचे पानिपत अटळ असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
Lok Sabha Election 2019; गजभिये रामटेकच्या मैदानात आहेत का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2019 11:06 AM
आता निवडणुकीला केवळ ९ दिवसाचा कालावधी शिल्लक असताना कॉँग्रेसचे उमेदवार किशोर गजभिये यांची प्रचार यंत्रणा तालुका पातळीवरील कार्यकर्त्यापर्यंत पोहोचली नसल्याने गजभिये खरच रामटेकच्या मैदानात आहेत का, असा सवाल सामान्य काँग्रेस कार्यकर्ते करू लागले आहेत.
ठळक मुद्देकॉँग्रेस कार्यकर्त्यांचा सवाल प्रचार यंत्रणा फेल