लोकमत वृत्तसेवा
नागपूर : महिलांबद्दल गलिच्छ विधान करुन भाजपा नेत्या स्मृती इराणी यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविणाऱ्या आमदार पुत्राची नागपूर लोकसभा मतदार संघाचे काँग्रेस उमेदवार नाना पटोले यांनी पाठ थोपटून त्याचे कौतुक केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.
महिला आणि स्मृती इराणी यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणारे जयदीप कवाडे हे पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष आणि विधान परिषद सदस्य जोगेंद्र कवाडे यांचे सुपुत्र आहेत. स्थानिक नागपुरातील बगडगंज भागात काँग्रेस उमेदवार नाना पटोले यांच्या सोमवारच्या प्रचार सभेत त्यांनी हे संतापजनक वक्तव्य केले. त्यांच्या या वादग्रस्त भाषणाचा व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर आता व्हायरल झाला आहे. याच सभेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही संबोधित केले होते. मात्र, कवाडे यांनी हे आक्षेपार्ह वक्तव्य केले त्यापूर्वीच ते निघून गेले होते.
यावेळी जाहीर सभेला संबोधित करताना जयदीप कवाडे म्हणाले की, 'स्मृती इराणी ही मस्तकावर खूप मोठे कुंकू लावते, आम्ही माहीत केल्यावर कळले की, जेवढे तिचे नवरे, तेवढेच मोठे मस्तकावरील कुंकू असते. स्मृती इराणी लोकसभेत गडकरींच्या मांडीला मांडी लावून बसते आणि संविधान संशोधन करण्याची भाषा करते, मात्र स्मृती इराणी ला माहीत नाही की, संविधान बदलणे हे नवरे बदलण्या एवढे सोपे काम नाही,' असेही वादग्रस्त विधान कवाडे यांनी यावेळी केले. कवाडे यांचे भाषण सुरू असताना या सभेत महिला कार्यकर्त्यासुद्धा उपस्थित होत्या. त्यांनीही यावेळी माना खाली घातल्या. कवाडे यांचे भाषण संपल्यानंतर नाना पटोले यांनी त्यांना बाजूला बसवून शाबासकी दिली.