लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभेच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्ष व निवडणूक विभागाने केलेल्या प्रसार, प्रचारानंतरही नागपूरसारख्या मेट्रोपॉलिटीन मतदारसंघात मतदानाच्या टक्केवारीत घट झाली. तर विस्ताराने अफाट व दुर्गम भागाचा समावेश असणाऱ्या रामटेक मतदारसंघात मात्र मतदारांनी आपला जोश हायच ठेवला. नागपुरात ५४.७४ टक्के म्हणजेच २०१४ च्या तुलनेत २.३८ टक्के कमी मतदान झाले. तर रामटेकमध्ये ६२.१२ टक्के मतदानाची नोंद झाली. गेल्यावेळी येथे ६२.६४ टक्के मतदान झाले होते.नागपुरात भाजपा नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व काँग्रेसकडून माजी खासदार नाना पटोले यांच्यात ‘हायप्रोफाईल’ लढत होती. या लढतीकडे देशाचे लक्ष होते. त्यामुळे येथे जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी भाजपा व काँग्रेस हे दोन्ही पक्ष ‘बूथ मॅनेजमेंट’ वरून शत प्रतिशत मतदान होण्यासाठी जोरात कामाला लागले होते. निवडणूक विभागही अधिक सतर्क होता. विशेष म्हणजे या वेळी मतदानाची वेळ तासभराने वाढविण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही नागपुरातील मतांची टक्केवारी घटली. २०१४ मध्ये १९ लाख ७८४ मतदारांपैकी १० लाख ८५ हजार ७६५ मतदारांनी (५७.१२टक्के ) मतदान केले होेते. यावेळी २१ लाख ६० हजार २१७ मतदारांपैकी ११ लाख ८२ हजार ५०७ मतदारांनी (५४.७४ टक्के ) हक्क बजावला. यावरून २.३८ टक्के मतदान कमी झाले असले तरी झालेल्या मतदार संख्येचा विचार करता ९६ हजार ७४२ मतदानाची प्रत्यक्ष भर पडली आहे. नागपुरात मतदार यादीत मोठ्या प्रमाणात घोळ होता. अनेकांची नावेच गहाळ होती. काहींच्या नावात त्रुटी होत्या. तर एकाच कुटुंबातील व्यक्तींचे मतदान वेगवेगळ्या केंद्रांवर देण्यात आले होते. या सर्व बाबींचा मतदानावर परिणाम झाला. यात ४४ अंशांवर गेलेल्या उन्हानेही घाम फोडला.रामटेकमध्ये मात्र उमेदवारांची फारशी चर्चा नसताना, प्रचाराचा तेवढा जोर नसताना मतदारांचा जोश कायम राहिला. २०१४ मध्ये १६ लाख ७७ हजार २६६ मतदारांपैकी १० लाख ५० हजार ६४० मतदारांनी (६२.६४ टक्के ) हक्क बजावला होता. या वेळी १९ लाख २१ हजार ७४ मतदारांपैकी ११ लाख ९३ हजार ३०७ मतदारांनी (६२.१२ टक्के) हक्क बजावला. यावरून मतदानात ०.५२ टक्क्यांची किंचिंतशी घट झाली असली तरी प्रत्यक्ष मतदानात १ लाख ४२ हजार ७२० मतांची भर पडली आहे. यावरून ग्रामीण भागातील मतदार हा मतदानाबाबत शहरी मतदारांपेक्षा अधिक जागरूक असल्याचे दिसून आले आहे.