लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर लोकसभा मतदारसंघात बसपातर्फे मो. जमाल निवडणूक लढत आहेत. असे असूनही महापालिकेत त्यांच्या कक्षापुढे जमाल यांच्या नावाची पाटी पक्षाच्या चिन्हासह कायम होती. तसेच राष्ट्रवादीचे गटनेते यांच्या पाटीवर घड्याळ चिन्ह होते. आचारसंहितेचे उल्लंघन असल्याने यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच प्रशासनात खळबळ उडाली. सहायक आयुक्त महेश धामेचा यांनी काही अधिकाऱ्यांसह महापालिके च्या जुन्या इमारतीची पाहणी करून पदाधिकाऱ्यांच्या नावाच्या पाट्या हटवून नेत्यांचे फोटो झाकले.मो. जमाल यांच्या नावाची पाटी हटविली. त्यानंतर राष्ट्रवादीचे चिन्ह असलेली पाटी हटविण्यात आली. दोन्ही पाट्यांवर पक्षाचे चिन्ह असल्याने ही पाटी हटविणे आवश्यक होते.तसेच बसपाच्या कक्षातील मायावती, राष्ट्रवादीच्या कक्षातील शरद पवार, काँग्रेसच्या कार्यालयातील राजीव गांधी यांचे फोटो व तैलचित्र झाकण्यात आले. तसेच इतर पदाधिकाऱ्यांच्या कक्षातील फोटो व तैलचित्र झाकण्यात आले. तर काही ठिकाणचे फोटो हटविण्यात आले. महापौरांच्या कक्षासमोरील लॉबीत लावण्यात आलेले तैलचित्र, महिला व बाल कल्यास समिती कक्षासमोरील शिलालेख कागदांनी झाकण्यात आला. आचारसंहितेच्या कालावधीत कोणत्याही राजकीय नेत्यांचे फोटो वा तैलचित्र लावले जाणार नाही. यासंदर्भात संबंधितांना निर्देश देण्यात आले.
एसीचा वीजपुरवठा बंदनिवडणूक आचारसंहितेमुळे पदाधिकारी, गटनेते महापालिका मुख्यालयत फारसे येत नाहीत. मात्र त्यांच्या कक्षातील एसी, पंखे, दिवे दिवसभर सुरू असतात. यामुळे विजेची नासाडी होत असल्याबाबतचे वृत्त लोकमतने प्रकाशित केले होते. त्यानंतर प्रशासनाने संबंधित कक्षातील एसीला होणारा वीज पुरवठा खंडित केला. तसेच कक्ष खाली असताना पंखे व दिवे बंद ठेवण्याचे निर्देश दिले. याचा परिणाम शुक्रवारी दिसून आला. मात्र सत्तापक्षाच्या कार्यालयातील पंखे व दिवे सुरू होते. त्यामुळे या कक्षातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनाही अधिकारी घाबरत तर नाही ना असा प्रश्न निर्माण झाला आहे.