लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभा निवडणुकीमध्ये दिव्यांग मतदारांना मतदान करणे सोईचे जावे म्हणून निवडणूक आयोगातर्फे मोफत वाहनांची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यासोबतच दिव्यांगांना मतदान केंद्रांवर विविध सुविधा देण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने यंदा पीडब्ल्यूडी हे नवीन अॅप उपलब्ध करून दिले आहे. या अॅपवर आतापर्यंत ११ हजार सूचना आल्याची माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली.लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी जिल्हा निवडणूक विभागातर्फे विविध जनजागृतीपर कार्यक्रम राबविले जात आहेत. दिव्यांग मतदारांनाही मतदान केंद्रांवर जाऊन मतदान करता येणे सोईचे होणार आहे. निवडणूक आयोगाने दिव्यांग मतदारांसाठी सुलभ निवडणुका हे घोषवाक्य निश्चित केले आहे. दिव्यांगांना मतदानाकडे आकर्षित करण्यासाठी तसेच त्यांच्यासाठी मतदान प्रक्रिया अधिकाधिक सुलभ व्हावी यासाठी आयोगाने पुढाकार घेतला आहे. दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, अपंग कल्याण आयुक्तालय यांची या कामी मदत घेण्यात येत आहे. त्यांच्या साहाय्याने यंदा दिव्यांग मतदारांची विशेष नोंदणी मोहीम राबवण्यात आली आहे. अपंगांना मतदान केंद्रांवर आवश्यक सुविधा पुरवण्यात याव्यात, असे निर्देश आयोगाकडून आलेले आहेत. या सुविधांबाबत निवडणुकीशी संबंधित अधिकाऱ्यांना विविध प्रशिक्षणांमध्ये अवगत करण्यात आले आहे. दिव्यांगांना सुविधा देण्यासाठी जिल्हास्तरावर सुकाणू समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमार्फत दिव्यांगांना मतदान करण्यासाठी मतदान केंद्रापर्यंत आणि परत घरी सोडून देण्यासाठी प्रशासनातर्फे वाहनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.दरम्यान, दिव्यांगांची मतदर नोंदणी, मतदान केंद्राचा शोध, व्हीलचेअरची मागणी इत्यादी सोई उपलब्ध करून घेण्यासाठी पीडब्ल्यूडी हे अॅप उपलब्ध करून देण्यात आले आहे.हे मेबाईल अॅप डाऊनलोडसाठी गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. या अॅपवर जाऊन मागणी केल्यास दिव्यांग मतदारांना प्रशासनातर्फे व्हीलचेअर, मतदान केंद्रापर्यंत मोफत वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.सर्वात महत्त्वाचे म्हणजे या अॅपवर जाऊन दिव्यांग मतदार म्हणून नोंदणी करता येईल, त्यामुळे दिव्यांग मतदारांची नेमकी संख्या लक्षात येईल आणि त्यानुसार प्रशासनाला सुविधा उपलब्ध करून देता येईल.
अशा असतील सुविधामतदान केंद्रांवर दिव्यांगांसाठी स्वतंत्र रांग, रॅम्प सुविधा, व्हीलचेअर जाऊ शकेल असा मोठा दरवाजा, दिव्यांगांसाठी स्वतंत्र पार्किंग आदी सुविधा राहणार आहे.