लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभेच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आदर्श आचारसंहिता लागू झाली. आदर्श आचारसंहितेसंदर्भात निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. त्यानुसार राजकीय नेत्यांचे फोटो वा पक्षाचा प्रचार होईल अशा जाहिरातीचे बॅनर्स, होर्डिग काढण्याचे आदेश दिले. परंतु त्यानंतरही काही पेट्रोलपंपावरील जाहिराती हटविण्यात आलेल्या नव्हत्या. जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी मंगळवारी पेट्रोलपंप चालकांना अशा जाहिराती हटविण्याचे निर्देश दिले. दरम्यान महापालिकेच्या जाहिरात विभागातर्फे शहराच्या विविध भागातील होर्डिग व बॅनर काढण्यााची कार्यवाही दुसऱ्या दिवशी मंगळवारी सुरू होती. सकाळी शहरात ठिकठिकाणी राजकीय नेत्यांचे होर्डिग व बॅनर झळकत होते. ते दुपारी हटविण्यात आले. महापालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार सर्व झोन क्षेत्रातील राजकीय होर्डिग व बॅनर काढण्याची कार्यवाही सुरू होती. मात्र पूर्व व दक्षिण नागपुरातील काही ठिकाणी लावण्यात आलेले बॅनर व होर्डिग मंगळवारी सायंकाळपर्यत कायम होते.
कोनशिला झाकणारशहरातील चौक, मुख्य मार्गासोबतच प्रभागातील रस्त्यावर विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन करण्यात आल्याच्या कोनशिला लावण्यात आलेल्या आहेत. यावर राजकीय नेते व नगरसेवकांची नावे आहेत. अशा कोनशिला व फलक झाकले जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.