लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीची तारीख २३ मे जवळ येताच उमेदवारांच्या हृदयाचे ठोके वाढले आहे. मतदारांमध्येही उत्सुकता आहे. दुसरीकडे कळमना येथील पंडित जवाहरलाल नेहरू मार्केट यार्डमध्ये मतगणनेची तयारी पूर्ण झाली आहे. कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. व्हीव्हीपॅटच्या मतांची मोजणी करण्यात येणार असल्यामुळे यावेळी मतमोजणीला खूप वेळ लागेल. रात्री ११ नंतरच अंतिम निकालाची घोषणा होऊ शकेल, असे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी मंगळवारी कळमना येथे आयोजित पत्रपरिषदेत स्पष्ट केले.तत्पूर्वी रामटेकचे निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत फडके यांनी पत्रकारांच्या चमूला मतमोजणीची तयारी दाखवली. नागपूर आणि रामटेकसाठी वेगवेगळे शेड बनवण्यात आले आहेत. प्रत्येक शेडमध्ये विधानसभानिहाय सहा-सहा कक्ष तयार करण्यात आले आहे. प्रत्येक कक्षात १०-१० असे एकूण २० टेबल लावण्यात आले आहे. व्हीव्हीपॅटच्या मोजणीसाठी चारही बाजूंनी जाळीलावून एक केबिन तयार करण्यात आले आहे. सुरक्षेच्या उद्देशाने हे केबिन तयार करण्यात आले आहे. व्हीव्हीपॅटचा कागद उडून जाऊ नये म्हणून ही काळजी घेण्यात आली आहे. मतमोजणी विधानसभानिहाय केली जाणार आहे. दोन्ही शेडमध्ये उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींना बसण्याची व्यवस्था करण्यात आली आली आहे. मतमोजणी केंद्रातील मीडिया सेंटरमध्ये केबल टीव्ही व इंटरनेटची व्यवस्था करण्यात आली आहे. मोबाईल टॉयलेटही लावण्यात आले आहेत. मतमोजणीच्या कामात ८८८ कर्मचाऱ्यांची प्रत्यक्ष सेवा घेण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांवर ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मतांच्या मोजणीची जबाबदारी राहील. याशिवाय १०० पेक्षा अधिक कर्मचारी रिझर्व्ह ठेवण्यात आले आहेत. मतमोजणी २३ तारखेला सकाळी बरोबर ८ वाजता सुरू होईल. पोस्टल बॅलेट व ईव्हीएम मतांच्या मोजणीला एकाचवेळी सुरुवात होईल. पहिल्या फेरीसाठी जवळपास ४० मिनिटांचा वेळ लागण्याची शक्यता आहे. नंतरच्या फेºयांचा वेळ हा कमी होईल. ईव्हीएमच्या मोजणीनंतर प्रत्येक विधानसभेतील प्रत्येकी ५ व्हीव्हीपॅट मतांची मोजणी केली जाईल. या व्हीव्हीपॅट मशीनची निवड चिठ्ठी टाकून (ड्रॉ) केली जाईल. याशिवाय ज्या ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड झालेत. त्यातीलही व्हीव्हीपॅटची मोजणी केली जाईल, असेही जिल्हाधिकारी मुदगल यांनी स्पष्ट केले.यावेळी रामटेकचे निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत फडके, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजलक्ष्मी शहा, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर उपस्थित होते.भिंत तोडून काढण्यात येतील ईव्हीएमकळमना यार्ड परिसरातच मतमोजणी केंद्रापासून ४०० मीटर अंतरावर स्ट्राँग रुम बनवण्यात आली आहे. यात रामटेक व नागपूर या दोन्ही लोकसभा निवडणुकीत वापरण्यात आलेले ईव्हीएम मशीन त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात आलेले आहेत. सीआरपीएफ, एसआरपीएफ आणि नंतर स्थानिक पोलिसांची सुरक्षा आहे. दोन्ही लोकसभेच्या जागेसाठी दोन वेगवेगळे स्ट्राँग रुम आहे. स्ट्राँग रुमचे शटर कुलूप लावून सील केले असून त्याच्यासमोर विटा सिमेंटची भिंत बनवण्यात आली आहे. गुरुवारी सकाळी ६.३० वाजता राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमोर भिंत तोडून सील काढून ईव्हीएम काढल्या जातील. ईव्हीएमच्या वाहतुकीचे नियम अतिशय कडक आहेत. रामटेक आणि नागपूर या दोन्ही लोकसभेच्या ईव्हीएम मशीन सहा-सहा वाहनांमधून आणल्या जातील. यासाठी केवळ मारोती ओम्नी या गाड्यात वापरल्या जातील. त्यांचा रंगही ठराविक राहील. एका लोकसभेच्या ईव्हीएमची वाहतूक करणाºया गाडीचा रंग पिवळा तर दुसºया वाहनाचा रंग पांढरा राहील. नागपूरचे ईव्हीएम हे रस्त्याच्या उजव्या बाजूने तर रामटेकचे डाव्या बाजूने आणले जातील. ही पूर्ण प्रक्रिया सीसीटीव्ही कॅमेºयात कैद केली जाईल. या कॅमेºयांचा डिस्प्ले मतमोजणी केंद्रात निवडणूक निर्णय अधिकाºयांच्या खुर्चीजवळ राहील. ईव्हीएम उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधींच्या उपस्थितीत काढले जातील.आतापर्यंत ६० तक्रारीजिल्हाधिकारी मुदगल यांनी सांगितले की, निवडणूक प्रक्रियेबाबत आतापर्यंत एकूण ६० तक्रारी आल्या आहे. यात काँग्रेसतर्फे करण्यात आलेल्या सीसीटीव्ही डीव्हीआर आणि इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनमध्ये त्रुटी संदर्भात केलेल्या तक्रारींचाही समावेश आहे. यापैकी बहुतांश तक्रारींचा निपटारा झालेला आहे. केवळ दोन तक्रारींचा निपटारा शिल्लक आहे.