लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकशाही सुदृढ करायची असेल तर मतदानाची टक्केवारी वाढणे गरजेचे आहे. त्यासाठी मतदानाच्या बाबतीत लोकांच्या मनात कर्तव्यभावना निर्माण करणे गरजेचे आहे. जास्तीत जास्त मतदान व्हावे, निवडणूक आयोगापासून प्रशासनापर्यंत दरवर्षी विविध माध्यमातून आवाहन करण्यात येते. यावर्षी निवडणूक आयोगाने मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांचेही सहकार्य घेतले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडून संकल्पपत्र भरून घेण्यात येणार आहे.निवडणूक आयोगाकडून ‘सिस्टीमॅटिक व्होटर्स एज्युकेशन अॅण्ड इलेक्ट्रोरल पार्टीसिपेशन’ (स्वीप) हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. लोकसभेच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी सरासरीपेक्षा गेल्या काही दिवसांपासून खालावत चालली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावे, मतदारांनी कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता नैतिक पध्दतीने मतदानाचा हक्क बजवावा यासाठी शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकांमध्ये पालकांना मतदानासाठी प्रवृत्त करेल, असे संकल्पपत्र प्रत्येक शालेय विद्यार्थ्यांकडून भरून घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला दिल्या आहेत. याअंतर्गत सर्व शाळेच्या मुख्याध्यापकांना विद्यार्थ्यांकडून त्यांचे पालक आगामी लोकसभेच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावतील, असे संकल्पपत्र भरुन घ्यायचे आहे. ‘स्वीप’साठी नोडल अधिकारी म्हणून जि.प.च्या पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार यांची नेमणूक केली आहे.
संकल्पपत्राचा नमुनासंकल्पपत्रात विद्यार्थ्याला आपले नाव, वर्ग, शाळा लिहायची आहे. याद्वारे संकल्प करतो की, आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये माझे पालकांना मतदान करुन राष्ट्रीय कार्यात सहभागी होण्याकरिता प्रवृत्त करील तसेच माझे परिसरातील अन्य व्यक्तींना देखील मतदान करण्याकरिता प्रवृत्त करीन.