लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सीबीआय, ईडी व पोलीस अशा तपास यंत्रणाचा वापर विरोधकांना गप्प करण्यासाठी करीत आहेत. त्यांनी वर्धा येथील प्रचार सभेतून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना तिहार कारागृहाची भिती दाखविणे हा असाच दमबाजीचाच प्रकार आहे. मग त्यांनी पाच वर्ष वाट का बघितली. अशी बोचरी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना केली.'राष्ट्रवादीच्या नेत्यांची झोप सध्या उडाली आहे. झोप उडण्याचे कारण तिहार कारागृहात बंदिस्त आहे. तो चौकशीत सगळं काही बोलून गेला तर आपलं काय होईल, याची भीती राष्ट्रवादीच्या नेत्यांना असल्याची टीका नरेंद्र मोदी यांनी केली होती. या आरोपाचा समाचार घेताना भुजबळ म्हणाले, सीबीआय, ईडी अशा तपास यंत्रणांचा वापर विरोधक व प्रसार माध्यमांचा आवाज दाबण्यासाठी केला जात आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, पी. चिदंम्बरम यांच्यासह प्रसार माध्यमांच्या विरोधात या यंत्रणेचा गैरवापर केला जात आहे. वास्तविक पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या विरोधात गोध्रा प्रकारणात केसेस आहेत. न्यायाधीश लोया यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे, अशी प्रकरणे रिओपन होऊ शकतात.महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार सर्वात शक्तीशाली नेते असल्याने नरेंद्र मोदी यांनीही हे मान्य केले आहे. म्हणूनच त्यांना टार्गेट केले जात आहे. मात्र मोदी शेतकरी आतमहत्या, नोटाबंदी शंभर टक्के यशस्वी झाली का, दिलेल्या आश्वासना प्रमाणे दरवर्षी२ कोटी बेरोजगारांना रोजगार मिळाला का, आश्वासनानुसार प्रत्येका १५ लाख दिले का, देशातील दहशतवादाची समस्या, असे मुद्दे सोडून दुसऱ्याच्या घरात काय सुरू आहे. यात धन्यता मानत असल्याचे भुजबळ म्हणाले.मोदी व शहा यांच्या जोडी देशाच्या मुळावर उठली आहे. देशभरात केंद्र सरकारच्या विरोधात असंतोष आहे. निवडणुकीनंतर देशात सत्ता परिवर्तन होईल. असा विश्वास भुजबळ यांनी व्यक्त केला.
Lok Sabha Election 2019; मोदी यांनी तिहारची भिती दाखविणे हा दमबाजीचा प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2019 2:59 PM
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना तिहार कारागृहाची भिती दाखविणे हा दमबाजीचाच प्रकार आहे. मग त्यांनी पाच वर्ष वाट का बघितली. अशी बोचरी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना केली.
ठळक मुद्देछगन भुजबळ यांची बोचरी टीकामोदी, शहा यांचेही गोध्रा प्रकरण रिओपन होऊ शकते