लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सार्वजनिक लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली असून प्रशासन इलेक्शन मोडवर आले आहे. नागपूर व रामटेक लोकसभा निवडणूक पहिल्याच टप्प्यात होणार आहे. यासोबतच काटोल विधानसभेची पोटनिवडणूकही होणार असून यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. यंदाच्या निवडणुकीमध्ये उमेदवारांच्या सोशल मीडियावरही प्रशासनाची नजर राहील, हे विशेष.जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी सोमवारी पत्रपरिषदेद्वारा निवडणुकीबाबतच्या तयारीची सविस्तर माहिती दिली. उमेदवारांना उमेदवारी अर्जासोबतच जे अॅफिडेव्हीट द्यावे लागते, त्यात यंदा उमेदवारांना ते वापरत असलेले व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम, ट्विटर, फेसबुक, यूट्युुब आदीची माहितीही भरावयाची आहे. यासोबतच पेड न्यूवर लक्ष ठेवण्यासाठी मीडिया मॉनिटरिंग कमिटीच स्थापनाही करण्यात आली आहे. या कमिटीमध्ये मीडियाच्या प्रतिनिधीसह सायबर तज्ज्ञांचाही समावेश करण्यात आला आहे. यावेळी सोशल मीडियावरील जाहिरातीवरही विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, पोलीस अधीक्षक राकेश ओला, मनपा आयुक्त अभिजित बांगर, नासुप्र सभापती शीतल उगले, सीईओ संजय यादव, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांजी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजलक्ष्मी शहा आदी उपस्थित होेते.
जाहिरात प्रकाशनासाठी मंजुरी आवश्यकजाहिरातीवर नजर ठेवण्यासाठी मीडिया मॉनिटरिंग कमिटी स्थापन करण्यात आली आहे. जाहिरात किंवा प्रचार साहित्याचा मजकूर (आॅडिओ-व्हिडीओ) प्रकाशन करण्यापूर्वी तो मीडिया मॉनिटरिंंग कमिटीला दाखविणे बंधनकारक आहे. त्यांचे प्रमाणपत्र घेतल्यानंतरच ते प्रकाशित केले जाईल.पेड न्यूजसंदर्भात काही तक्रार आल्यास २४ तासाच्या आत समितीला त्यावर निर्णय घ्यायचा आहे. समितीकडे तक्रार असल्यास कमिटीची तातडीची बैठक होईल. त्याची खातरजमा केली जाईल. त्यात काही तथ्य आढळल्यास संबंधितांना नोटीस पाठवून खुलासा मागवला जाईल. खुलासा समाधानकारक राहिला तर ठीक अन्यथा पेड न्यूजचा खर्च संबंधिताच्या खात्यात जोडला जाईल.