- राजेश शेगोकार
नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात मतदान होणाऱ्या उपराजधानी नागपूरसह पूर्व विदर्भातील पाच मतदारसंघांच्या लढती म्हणजे महाराष्ट्रातील एकूणच घनघोर लढाईचा पूर्वरंग आहे. रामटेकचा अपवाद वगळता नागपूर, भंडारा-गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली-चिमूर या मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पक्ष विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत अपेक्षित आहे आणि दोन्ही राष्ट्रीय पक्षांसोबतच चंद्रशेखर बावनकुळे व नाना पटोले हे दोन्ही पक्षांचे प्रदेशाध्यक्ष तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची प्रतिष्ठा या निमित्ताने पणाला लागली आहे.
नागपूर मतदारसंघात भाजपकडून नितीन गडकरी यांच्या उमदेवारीची घाेषणा पहिल्याच यादीत न झाल्याने पक्षात काही काळ अस्वस्थता निर्माण झाली हाेती. मात्र, कुठेही याचे प्रगटीकरण हाेणार नाही यासाठी पक्ष ‘दक्ष’ हाेता. गडकरी यांच्या विराेधात काँग्रेसने आमदार विकास ठाकरे यांना रिंगणात उतरविले आहे. ठाकरे यांचे नाव ठरविताना काँग्रेसचे सर्व गटतट एकत्र आले हाेते.
रामटेक या राखीव मतदारसंघात भाजपच्या दबावात शिंदेंच्या शिवसेनेला उमरेडचे आमदार राजू पारवे या ऐनवेळी आयात केलेल्या उमेदवाराला पसंती द्यावी लागली आहे. त्यांच्या विराेधात काँग्रेसकडून उमेदवारीच्या प्रबळ दावेदार रश्मी बर्वे यांच्या जात प्रमाणपत्रापासून अनेक मुद्द्यांवर चांगलीच अडचण निर्माण केली हाेती. काँग्रेसमध्येच चांगलीच चढाओढ, कुरघाेडीही झाली. मात्र, बर्वे यांनी पक्षांतर्गत लढाई जिंकून आता रामटेकच्या रिंगणात उडी घेतली आहे. त्यामुळे रामटेकची निवडणूकही लक्षवेधी ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.
थेट लढतीत तिसरा काेण?या पाचही मतदारसंघांत सध्या भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत दिसत असली तरी गेल्या वेळी तिसऱ्या उमेदवारांनी घेतलेल्या मतांमुळे विजयाचा लाेलक फिरला हाेता. चंद्रपूर, गडचिराेलीमध्ये वंचित बहुजन आघाडी, भंडारा-गाेंदिया, नागपूर, रामटेकमध्ये बहुजन समाज पार्टीची ताकद दुर्लक्षित करून चालणार नाही. या दोन्ही पक्षांनी अद्याप आपले उमेदवार जाहीर केलेले नाहीत. या पाचही मतदारसंघांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना ‘घर’ सांभाळण्याची कसरत करावी लागेल.
गडचिरोली-चिमूर मतदारसंघात भाजपविरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत होत असून, भाजपने जागा व उमेदवारही कायम ठेवत शेवटच्या क्षणी राष्ट्रवादीला (अजित पवार गट) शह दिला. त्यामुळे खासदार अशोक नेते हे तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. दुसरीकडे काँग्रेसने प्रदेश महासचिव डॉ. नामदेव किरसान यांना उमेदवारी दिली.२०१४ व २०१९ मध्ये माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी काँग्रेसकडून किल्ला लढविला होता. त्यांना यश आले नाही; दुसऱ्यावेळी त्यांनी भाजपचे मताधिक्य कमी करूनही यावेळी त्यांना डावलल्याने त्यांनी पक्षाचा राजीनामा देत मंगळवारी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन भाजपमध्ये प्रवेश घेतला.
पटाेलेंचा डाव पटेल उधळणार का?भंडारा - गोंदिया मतदारसंघात नाना पटाेले यांनी ऐनवेळी डॉ. प्रशांत पडोळे हा नवखा; परंतु सहकारमहर्षी यादवराव पडोळे यांच्या कार्याचे वलय असलेला तरुण उमेदवार दिला असला तरी येथे परीक्षा पटाेले यांचीच आहे. त्यांनीच निवडणूक लढवावी, असा आग्रह बैठकांमधून हाेत असतानाही पटाेलेंनी अंग काढून घेतले. त्यामुळे आता पटाेलेंचीच प्रतिष्ठा डावावर लागली आहे. या मतदारसंघात राज्यसभा सदस्य प्रफुल्ल पटेल यांची असलेली पकड महत्त्वाची असल्याने लढत चुरशीची हाेईल.भंडारा - गोंदिया लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार असलेले भाजपचे उमेदवार सुनील मेंढे हे उमेदवारीसाठी ऑक्सिजनवर हाेते. अखेर त्यांना उमेदवारी दिली त्यांच्या विराेधात काँग्रेसने डॉ. प्रशांत पडोळे यांना उमेदवारी दिली आहे. येथे जातीच्या राजकारणाचा प्रभाव नेहमीच पाहण्यात आला आहे. कुणबी, तेली यासोबतच दलित, पोवार, मुस्लीम मतदारांचा कलही महत्त्वाचा ठरताे.
चंद्रपुरात धानाेरकरच; वडेट्टीवारांकडे लक्षगेल्या वेळी राज्यात केवळ चंद्रपुरातच काँग्रेसला बाळू धानाेरकर यांच्या रूपाने विजय मिळविता आला, येथून उमेदवारी मिळविण्याच्या चढाओढीत आमदार प्रतिभा धानाेरकर व विजय वडेट्टीवार यांच्या गटातील वातावरण चांगलेच तापले.अखेर या जागेचा वारसा शिवानी वडेट्टीवार यांना न मिळता आ. प्रतिभा यांच्याकडे आला आहे. त्यामुळे आता वडेट्टीवार यांची भूमिका कशी राहील, याकडे लक्ष असेल. धानाेरकर यांच्या विराेधात भाजपचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पक्षादेश मानत रिंगणात उडी घेतली आहे. त्यामुळे ही ‘बिग फाइट’ ठरेल.