राजेश शेगोकार
नागपूर : भाजपने मिशन लोकसभा आणि विधानसभेची जोरदार तयारी वर्षभरापूर्वीच सुरू केली आहे. तरीही लोकसभेच्या जास्तीत जागा जिंकण्याचे ध्येय ठेवणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना ४२ जागांवर ‘सेफ’ वाटत असून राज्यातील सहा लोकसभा मतदारसंघ धोकादायक वाटत आहेत. पत्रकारांशी बोलताना त्यांनी असे वक्तव्य केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे २००४ ते २०१४ असा सलग तीन वेळा जिंकलेल्या या मतदारसंघात भाजपला धाेका कशापासून याची चर्चा आता सुरू झाली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा, बल्लारपूर, चंद्रपूर व वरोरा आणि यवतमाळ जिल्ह्यातील वणी व आर्णी या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश असलेल्या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचा मागोवा घेतला तर गेल्या बारा निवडणुकीत चार वेळा भाजपने विजय मिळविला आहे. १९९६ मध्ये भाजपचे हसंराज अहिर यांनी पहिल्यांदा विजय मिळवून भाजपचा झेंडा रोवत काँग्रेसला मात दिली. मात्र, पुढच्या दोन्ही निवडणुका काँग्रेसने जिंकून या मतदारसंघात भाजपचा झंझावात दहा वर्षे रोखून ठेवला होता. पुढे मात्र हॅट्ट्रिक करत भाजपने या मतदारसंघात आपले स्थान बळकट केले. त्या स्थानाला गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे बाळू धानोरकर यांनी सुरुंग लावला. तेथूनच भाजपची ताकद पोखरली गेली आहे. भाजपकडून लोकसभेच्या ४८ मतदारसंघांचे निवडणूक प्रमुख जाहीर करून प्रत्येक मतदारसंघात पक्षाची बांधणी केली जात असली तरी चंद्रपुरात भाजपचे ऑन फिल्ड वर्क कमी पडते यावर बावनकुळे यांच्या वक्तव्याने शिक्कामोर्तब झाले आहे.
सरळ लढतीची भीती
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत काँग्रेस व भारतीय जनता पक्षात सरळ लढत झाली की, काँग्रेसला विजय मिळतो मात्र तिरंगी लढत झाल्यास भाजपला यश मिळते हा इतिहास आहे. हंसराज अहिर यांच्या चार वेळच्या विजयांमध्ये तिसऱ्या उमेदवारामुळे होणारे मतविभाजन निर्णायक ठरले. या पृष्ठभूमीवर इंडिया आघाडी कायम राहत जर एकच उमेदवार दिला तर सरळ लढतीत भाजपला अडचण येऊ शकते.
जातीय समीकरणांचे गणित जुळेना
काँग्रेसने बाळू धानोरकर यांना उमदेवारी दिल्यानंतर काँग्रेसच्या बाजूने जातीय समीकरणे जुळून आली त्यामुळे गेल्या निवडणुकीत तिसऱ्या उमेदवाराची एन्ट्री अन् अहिर यांची मते वाढूनही ती विजयासाठी पुरेशी ठरली नाहीत. यावेळी काँग्रेस विद्यमान आमदार प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी देण्याची चिन्हे आहेत. ही उमेदवारीच भाजपसाठी अडचणीची ठरू शकेल अशी चर्चा आहे. शिवाय मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे पडसाद जातीय समीकरण अधिक बळकट करण्याची भीती भाजपला असावी.
तीन मतदारसंघ भाजपकडे पण..!
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात सुधीर मुनगंटीवार (बल्लारपूर), संजीव रेड्डी बोदकुरवार (वणी) व संदीप धुर्वे (आर्णी) हे तीन आमदार भाजपचे, तर सुभाष धोटे व प्रतिभा धानोरकर हे दोन काँग्रेसचे आमदार आहेत. चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार अपक्ष असले तरी आता ते भाजपकडे झुकलेले आहेत त्यामुळे भाजपची ताकद दिसत असली तरी प्रत्यक्षात गेल्या लोकसभा निवडणुकीत वणी व आर्णी या दोन मतदारसंघांतच भाजपला आघाडी होती.
नवा चेहरा देण्याची हिंमत करणार का?
गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे धानोरकर यांनी हॅटट्रिक नोंदविणारे हंसराज अहिर यांचा पराभव केला. आताही धानोरकर यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबाप्रती सहानुभूतीची लाट कायम आहेच दूसरीकडे आ. प्रतिभा धानोरकर यांनी सक्रियता कायम ठेवून संपर्क वाढविला आहे त्यामुळे त्यांना तिकीट मिळाल्यास त्यांच्या विरोधात पुन्हा अहिर यांचाच पर्याय सध्या तरी भाजपकडे आहे. जातीय समीकरणाला मात देऊ शकणारे सुधीर मुनगंटीवार हे चांगला पर्याय होऊ शकतात, पक्षाचा आदेश मानून ते तयारही होतील मात्र भाजपतील छुपे शह काटशहचे राजकारण त्यांना त्रस्त करेल असे बोलले जाते. त्यामुळे भाजप नवा चेहरा देण्याची हिंमत करणार का?