लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभा निवडणुकांचे निकाल अवघ्या काही तासांवर आले असताना राजकीय पक्षांमधील धाकधूक वाढली आहे. ‘एक्झिट पोल्स’नंतर काही भाजपा-सेनेच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे तर कॉंग्रेस-राष्ट्रवादीसह इतर पक्षांकडून या आकड्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. निकालात आपलाच उमेदवार जास्त मतं घेणार असा दावा प्रत्येकच राजकीय पक्षाकडून करण्यात येत आहे.नागपूर व रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी ११ एप्रिल रोजी मतदान झाले होते. त्यानंतर बरेचसे नेते व कार्यकर्ते देशातील विविध भागात होत असलेल्या इतर टप्प्यातील प्रचारात व्यस्त होते. निकालाचा आठवडा आल्यानंतर अनेकांकडून संभाव्य परिस्थितीवर मंथन सुरू झाले आहे. विधानसभानिहाय, जातीनिहाय मतांची टक्केवारी कशी राहील यासंदर्भात बेरीज-वजाबाकी मांडणे सुरू आहे. ‘एक्झिट पोल्स’नुसार नागपूरमध्ये भाजपाचे नितीन गडकरी व रामटेकमध्ये शिवसेनेचे कृपाल तुमाने विजयी होतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र याअगोदर अनेकदा ‘पोल्स’ चुकले असून जनतेची साथ आपल्यालाच होती, असा दावा कॉंग्रेस-राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे. आता नागपूर व रामटेकच्या गडाचे सरदार कोण बनणार हे गुरुवारीच स्पष्ट होणार आहे.गडकरींचे मताधिक्य वाढेल‘एक्झिट पोल्स’मधून आलेले आकडे हे निकालांचे संकेतच आहे. देशातील जनतेचा भाजपा सरकारवर विश्वास आहे हेच निकालांतून दिसून येईल. नागपूर व रामटेकमध्ये अनुक्रमे नितीन गडकरी व कृपाल तुमाने हेच विजयी होतील. नागपुरात तर गडकरी यांचे मताधिक्य मागील वेळेपेक्षा आणखी जास्त वाढेल हा आम्हाला विश्वास आहे.-आ.सुधाकर कोहळे, शहराध्यक्ष, भाजपानागपूर, रामटेकमध्ये आघाडीचाच विजय‘एक्झिट पोल्स’ म्हणजे काही अखेरचा निकाल नसतो. तेथील आकडे काहीही म्हणत असले तरी प्रत्यक्ष परिस्थितीत वेगळी होती. नागपूर व रामटेकमधील निवडणुकीच्या वेळचे मुद्दे, जातीय समीकरण, नागरिकांमधील सत्ताधाऱ्यांबाबतचा रोष या बाबी पाहता दोन्ही ठिकाणी आमचाच विजय होईल. शिवाय यावेळेला थेट लढत होती. इतरांना मतं न पडता ती आघाडीच्या पारड्यात पडली आहेत.-विकास ठाकरे, शहराध्यक्ष, कॉंग्रेस‘एक्झिट पोल्स’ विश्वासार्ह नाहीचजे आकडे ‘एक्झिट पोल’मधून दाखवत आहेत ते विश्वासार्ह नाहीत. मुळात नागपूर व रामटेक मतदारसंघात अनुसूचित जाती, मुस्लिम, ख्रिश्चन, हलबा, आदिवासी यांची मते आघाडीलाच मिळाली आहेत. याशिवाय कॉंग्रेस-राष्ट्रवादीची पारंपारिक मतं आहेतच. युतीला ही मतं मिळालीच नाही. त्यामुळे एकूणच गणित पाहिले असता आघाडीच्या उमेदवारांचे पारडे भारी राहणार असल्याचीच चिन्हे आहेत.-अनिल अहिरकर, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस