लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: देशात आणीबाणी लागू झाल्यानंतर समाज ढवळून निघाला होता. आणीबाणी उठल्यानंतर झालेल्या निवडणुका या ऐतिहासिक ठरल्या होत्या. देशात कॉंग्रेसविरोधी वातावरण होते. १९७१ च्या निवडणुकांमध्ये नागपूरची जागा कॉंग्रेसच्या हातून निसटली होती. जनसंघ तसेच संघ स्वयंसेवकदेखील सक्रिय झाले होते. अशा स्थितीत १९७७ मध्ये नागपूरमध्ये कॉंग्रेसचे काय होणार याबाबत प्रश्न उपस्थित होत होते. मात्र कॉंग्रेसचे उमेदवार गेव्ह आवारी यांनी सर्वांचे अंदाज मोडून काढत विजय पटकावला होता.आणीबाणीनंतर कॉंग्रेस (ओ.), जनसंघ, समाजवादी पक्ष आणि लोकदल हे चार पक्ष विलीन झाले व जनता पक्ष स्थापन करण्यात आला. कॉंग्रेसने अवघ्या २५ वर्षांचे तरुण नेते व तत्कालीन नगरसेवक गेव्ह आवारी यांच्यावर विश्वास दाखविला तर खोरिपातर्फे बॅ. राजाभाऊ खोब्रागडे हे मैदानात उतरले. नागपूर हा तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेला मतदारसंघ होता. मात्र नागपुरातून जनता पक्षाचा एकही उमेदवार उतरविण्यात आला नव्हता. त्यांनी खोब्रागडे यांना समर्थन दिले होते. १९७१ साली विजयी झालेले खासदार जांबुवंतराव धोटे यांनी अपक्ष म्हणून आव्हान दिले. उर्वरित सातही उमेदवार हे अपक्षच होते. यात भाऊराव तिमांडे, गंगाधर तेलरांधे, रविलाल गांधी, शामराव वांजरकर, शामराव देशभ्रतार, विजयकुमार तेलवाले, श्रीपाद किसान यांचा समावेश होता. नागपुरात खऱ्या अर्थाने तिरंगी लढतच होती. देशभरात कॉंग्रेसविरोधात रोष होता. मात्र विदर्भात इतर पक्षांना विशेष वाव दिसून येत नव्हता.बॅ.खोब्रागडे हे राज्यसभा खासदार होते तसेच उपसभापती देखील राहून चुकले होते तर विदर्भवीर जांबुवंतराव धोटे यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे त्यांना मानणाऱ्या लोकांची संख्या फार मोठी होती. या तुलनेत आवारी हे फारच नवीन होते. गांधी विचारांच्या कुटुंबातून ते आले होते. मात्र राजकीय अनुभव फारसा नव्हता. देशात विविध राज्यांत कॉंंग्रेसच्या बालेकिल्ल्यांना हादरे बसत होते. मात्र विदर्भात बॅ. शेषराव वानखेडे, नरेंद्र तिडके, वसंतराव नाईक यांनी कॉंग्रेसशी जनतेशी नाळ टिकवून ठेवली होती. निकाल लागला तेव्हा प्रस्थापितांना धक्काच बसला होता.गेव्ह आवारी हे ४४.५५ टक्के मतं मिळवत विजयी झाले. बॅ. खोब्रागडे यांना ३३.७९ टक्के मतं मिळाली व ते दुसºया स्थानी राहिले. तर जांबुवंतराव धोटे यांना २०.५० टक्के मतच मिळाली. उर्वरित सातही अपक्षांची जमानत जप्त झाली होती. देशात इंदिरा गांधी यांच्यासह कॉंग्रेसच्या अनेक मोठ्या नेत्यांना पराभव पत्करावा लागला. मात्र विदर्भासह नागपूरच्या जनतेने कॉंग्रेसवर विश्वास टाकल्याचे दिसून आले.
इंदिरा गांधी यांची सभा हाऊसफुल्ल१९७७ च्या निवडणूकांच्या वेळी इंदिरा गांधी यांनी कस्तूरचंद पार्क येथे सभा घेतली होती. देशात त्यांच्या विरोधात लाट असतानादेखील नागपुरात मात्र सभा ‘हाऊसफुल्ल’ झाली होती. त्यावेळी वसंतराव नाईक, डॉ.रफीक झकेरिया यांनीदेखील नागपूरवर विशेष लक्ष केंद्रित केले होते. परिणामी नागपूरमध्ये कॉंग्रेसला यश मिळाले.