नागपूर : सत्तेत आल्यावर वेगळा विदर्भ देऊ या आश्वासनाचा भाजापाला विसर पडला आहे. काँग्रेसने तर वेळोवेळी वेगळ्या विदर्भाचा विरोध केला आहे. आता भाजपा व काँग्रेस हे दोन्ही पक्ष विदर्भ देणार नाहीत हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे विदर्भवादी पक्ष, संघटनांना एकत्र करून एक महाआघाडी उभारायची आणि लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका विदर्भाच्या मुद्यावर लढायच्या, असा निर्णय रविवारी विदर्भ राज्य आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अॅड. श्रीहरी अणे व ‘स्वराज इंडिया’ पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष योगेंद्र यादव यांच्या बैठकीत घेण्यात आला. यादव रविवारी सकाळी नागपुरात आले. रामनगर येथील स्वराज इंडियाच्या कार्यालयात त्यांची अॅड. अणे यांच्याशी तासभर बंदद्वार चर्चा झाली. या चर्चेत अॅड. रवि सन्याल, संदेश सिंगलकर, गिरीश नांदगावकर उपस्थित होते. बैठकीत अॅड. अणे यांनी विदर्भाच्या मुद्यावर सर्व विदर्भवादी पक्ष व संघटनांना एकत्र आणून निवडणूक लढविण्याचा प्रस्ताव ठेवला. योगेंद्र यादव यांनी हा प्रस्ताव मान्य करीत स्वराज इंडिया देखील यात सहभागी होईल, असे आश्वास्त केले. चर्चेत शेकाप, भारिप, रिपाईचे सर्व गट, आम आदमी पार्टी, विदर्भ माझा यांच्यासह विदर्भवादी पक्ष व संघटनांना एकत्र करून एक महाआघाडी उभारण्याचे ठरले. लवकरच संबंधितांशी चर्चा केली जाईल व सर्वांना एका मंचावर आणून त्याची रितसर घोषणा केली जाईल, असाही निर्णय घेण्यात आला. विदर्भातील नागरिक वेगळ्या विदर्भाच्या बाजूने आहे. भाजपा व काँग्रेसकडून आपली फसवणूक झाली, असा वैदर्भीय जनतेचा समज झाला आहे. त्यामुळे विदर्भाच्या मुद्यावर उभे राहणाºया महाआघाडीला लोक भरभरून पाठिंबा देतील, असा विश्वासही अॅड. अणे यांनी चर्चेत व्यक्त केला. तर या मोहिमेत आपण सक्रीयपणे सहभागी होऊ. कुणाला विनंती करायची असेल तर आपणही त्यासाठी पुढाकार घेऊ. निवडणुकीत यश मिळेल, अशीच बांधणी व आखणी करू, असे योगेंद्र यादव यांनी आश्वस्त केले. बैठकीनंततर यादव हे अमरावती येथे आयोजित सभेसाठी रवाना झाले. महाआघाडीला देणार संयुक्त नाव विदर्भाच्या नावावर विदर्भवादी पक्ष व संघटना एकत्र येऊन स्थापन होणाºया महाआघाडीला एक संयुक्त नाव देण्याच्या प्रस्तावावरही चर्चा झाली. संयुक्त नाव दिले की कुणालाही कमी-जास्त महत्व देण्याचा प्रश्नच उरणार नाही. एका बॅनरखाली प्रत्येकजण एक लक्ष्य घेऊन काम करेल, असेही बैठकीत ठरले. सोबतच महाघाडीत सामील होणारे पक्ष व संघटना यांचे संबंधित भागातील संघटन व प्राबल्य विचारात घेऊन जागा वाटप केल्या जातील, अशीही प्राथमिक चर्चा करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
विदर्भाच्या मुद्यावर एकत्र लढणार लोकसभा-विधानसभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 2:39 PM
विदर्भवादी पक्ष, संघटनांना एकत्र करून एक महाआघाडी उभारायची आणि लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका विदर्भाच्या मुद्यावर लढायच्या, असा निर्णय रविवारी विदर्भ राज्य आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अॅड. श्रीहरी अणे व ‘स्वराज इंडिया’ पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष योगेंद्र यादव यांच्या बैठकीत घेण्यात आला.
ठळक मुद्देश्रीहरी अणे व योगेंद्र यादव यांच्यात चर्चा : विदर्भवादी पक्ष व संघटनांनाही सोबत घेणार