लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊनच्या काळात शहरातील वायू प्रदूषण ज्याप्रमाणे घटले होते, त्याप्रमाणे ध्वनिप्रदूषणही सर्वात खालच्या स्तरावर होते. मात्र आता सर्व पूर्ववत सुरू झाले असल्याने रस्त्यावरही वाहने वाढली व कारखानेही सुरू झाले आहेत. अशावेळी शहरातील ध्वनिप्रदूषणाचा स्तर मोजण्याचे काम राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थे(नीरी)ने सुरू केले आहे. नीरीची टीम शहरातील विविध भागात जाऊन सर्वेक्षण करीत आहे.
गेल्या वर्षी दिवाळीच्या काळात ८०.८ डीबी ते ८१ डीबी ध्वनिप्रदूषणाची नाेंद करण्यात आली हाेती. याच काळात दमा आजाराच्या रुग्णात २० टक्क्याने वाढ झाली हाेती. सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार सध्या हवेत धाेकादायक कण नाहीत आणि ध्वनिप्रदूषणाचे प्रमाणही कमी आहे. गेल्या वर्षी तर दिवाळीच्या काळात नागपूर शहरात आवाजाचे प्रदूषण देशाची राजधानी दिल्लीपेक्षा अधिक हाेते. यावेळी परिस्थिती चांगली आहे. मात्र ही सुस्थिती आणखी किती काळ चांगली राहते, ते येणारा काळ ठरवेल. नीरीची टीम सर्व स्तरावर आकडे गाेळा करून अभ्यास रिपाेर्ट सादर करेल.
नवीन फीचरसह नाॅईस ट्रॅकर
मागील वर्षी नीरीद्वारे नाॅईस ट्रॅकर ॲप तयार केला हाेता. याद्वारे नागरिक त्यांच्या क्षेत्रातील ध्वनीचे प्रमाण सहज नाेंदवू शकत हाेते, साेबतच दुसऱ्या भागाची माहितीही घेणे शक्य हाेते. याच ॲपमध्ये आता काही नवीन आणि उत्तम फीचर जाेडण्यात आले आहेत.