लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : 'म्युकरमायकोसिस' अर्थात 'ब्लँक फंगस' सोप्या भाषेत काळ्या बुरशीचे शेकडो रुग्ण जिल्ह्यात आढळून येत आहे. त्यामुळे कोरोना झाल्यानंतर अनेकांना या आजाराने ग्रासले असून रुग्णांना या औषधांची टंचाई भासत आहे. अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी हा काळाबाजार रोखणे व संबंधित दोषींविरुद्ध कडक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.
लोकमतने बुधवारच्या अंकात म्युकरमायकोसिस औषधाच्या तुटवड्यासंबंधीची बातमी प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी वृत्ताची गांभीर्याने दखल घेत बुधवारी वरिष्ठ तज्ज्ञ डॉक्टरांची बैठक बोलावून या आजारासंबंधीचा आढावा घेतला. यामध्ये जिल्ह्यातील नाक, कान, घसा तज्ज्ञ ( इएनटी असोशिएशन ) दंत्त तज्ज्ञ ( डेंटिस्ट ) नेत्र तज्ज्ञ ( आय स्पेशालिस्ट ) डॉक्टर संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. याशिवाय जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, निवासी उपजिल्हाधिकारी अविनाश कातडे, तहसीलदार नीलेश काळे उपस्थित होते.बैठकीमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांनी म्युकरमायकोसिस संदर्भात जिल्ह्यामध्ये किमान तीनशे ते साडेतीनशे रुग्ण पुढे आल्याचे सांगितले.
म्युकरमायकोसिस संदर्भात ग्रामीण भागातील जनतेला सोप्या शब्दांमध्ये समजेल अशी उपचार पद्धत व आजाराबद्दलची माहिती सहज उपलब्ध होईल, असे नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तज्ज्ञ डॉक्टरांनी ग्रामीण भागातील खाजगी डॉक्टरांना तसेच अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या व वैद्यकीय अधिकारी कर्मचारी यांना या संदर्भातील मार्गदर्शन करण्याच्या सूचनाही केल्या.
ही आहेत लक्षणे
म्युकरमायकोसिस हा काळ्या बुरशीसारखा असतो. हा आजार केवळ डोळ्यांमध्ये नाही तर, मेंदू, हिरड्यांमध्ये तसेच छातीत देखील होऊ शकतो. डोळ्याच्या वरच्या पापणीला सूज येणे, पापणी खाली येणे, डोळा पुढे आल्यासारखा वाटणे, डोळ्यांभोवतीची त्वचा काळसर होणे, डोळ्यांची हालचाल मंदावणे, दोन वस्तू दिसणे, नाकावर सूज येणे , चेहऱ्यावर एका बाजूने सूज, डोळ्यांमध्ये वेदना, चावताना दात दुखणे, ही या आजाराची लक्षणे आहेत.
या रुग्णांना अधिक धोका
रोगप्रतिकारशक्ती कमी असणाऱ्या, मधुमेह असलेल्यांना या नवीन आजाराचा धोका अधिक आहे. कोरोना वाढल्यास ॲन्टिव्हायरल आणि स्टेरॉइड दिले जातात. काही रुग्णांमध्ये नंतर त्याचा प्रतिकूल परिणाम दिसून येतात. त्यामुळे कोरोना काळातील औषधांच्या वापरामुळे रुग्णांना म्युकरमायकोसिसचा धोका संभवतो, अशी माहिती उपस्थित डॉक्टरांनी दिली.
तातडीने इलाज करा
लक्षणे आढळल्यास त्वरित उपचारांची गरज असते. अन्यथा एक ते दोन आठवड्यांत ही बुरशी डोळे आणि मेंदूपर्यंत पोहोचू शकते. डोळा, जबडा यासंदर्भात गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कोविड होऊन गेलेल्या रुग्णांनी त्यांचे तोंड व डोळे यांची तपासणी नियमित करावी. त्यातही ज्यांना मधुमेह असेल त्यांनी तातडीने तपासणी करावी, असे आज बैठकीतील तज्ज्ञांनी स्पष्ट केले.
राज्यभरात तुटवडा
या आजाराच्या उपाचारात एमफोटेरेसिन बी इंजेक्शन ५० एमजी आणि पोसोकोनाजोल टॅबलेटचा उपयोग केला जात आहे. एका इंजेक्शनची किमत सहा ते आठ हजार रुपये आहे. शहरात या औषधांचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झाला आहे. पुण्यावरून लोक डॉक्टरांचे प्रीस्क्रीप्शन पाठवून नागपुरात औषध खरेदी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे हा तुटवडा केवळ नागपुरातच नव्हे तर राज्यभरात असल्याचे दिसून येते.