लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उघड्यावर व घाणीत तयार करण्यात येत असेलल्या पाणीपुरीसह निकृष्ट दर्जाच्या खाद्यपदार्थांचे धक्कादायक वास्तव ‘लोकमत’ने शनिवारी उघडकीस आणताच खळबळ उडाली. अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) वृत्ताची दखल घेत इतवारी नंगा पुतळा परिसरातील पाणीपुरीसह खाद्यपदार्थांचे हातठेले, किरकोळ हॉटेल्सवर धाडी टाकल्या. यावेळी तपासणीत दोषी आढळून आलेल्या १७ विक्रेत्यांवर कारवाई करीत नोटीस बजावण्यात आली. उघड्यावर विकल्या जाणाऱ्या दूषित अन्नाचे नमुनेही घेण्यात आले.पावसाळ्यात उघड्या पदार्थांच्या सेवनामुळे आजार वाढतात. विशेषत: गेल्या महिन्यात नागपुरात दूषित अन्नपदार्थांमुळे होणाऱ्या गॅस्ट्रोच्या रुग्णांत मोठी वाढ झाली आहे. जून महिन्यात एकट्या मनपाच्या आयसोलेशन दवाखान्यात या आजराचे ४९१ रुग्ण उपचारासाठी दाखल झाले. मेयो, मेडिकलसह खासगी रुग्णालय मिळून या रुग्णांची संख्या हजाराच्या घरात गेली आहे. डोळ्यादेखत घाणीत खाद्यपदार्थ तयार होत असताना व विक्री होत असतानाही साधी तपासणी होत नसल्याने लोकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात होते. ‘लोकमत’ चमूने हा विषय हाती घेऊन हातठेल्यांसाठी जिथे खाद्यपदार्थ तयार केले जातात त्या भागाची पाहणी केली. विशेषत: मोतीबाग रेल्वे लाईन परिसर, कमाल चौक गोंडपुरा, वनदेवीनगर, टेका-नाका, मंगळवारी, शाहू मोहल्ला, महेंद्रनगर, मेहंदीबाग उड्डाण पूल परिसर, शांतीनगर कॉलनी, प्रेमनगर, पिवळी नदी आदी झोपडपट्टी परिसरांना भेटी दिल्या असत्या अनेक धक्कादायक वास्तव सामोर आले. या भागात घाणीच्या साम्राज्यात, नाल्याच्या शेजारी व स्वच्छतेचे सर्व नियम डावलून पाणीपुरीपासून ते इतरही खाद्यपदार्थ तयार केले जात असल्याचे दिसून आले. याचे सविस्तर वृत्त ‘लोकमत’ने ६ जुलै रोजी ‘ऑन दी स्पॉट’मधून ‘नाल्याशेजारी बनते चविष्ट पाणीपुरी’, या मथळ्याखाली प्रसिद्ध केले. याची गंभीर दखल अन्न व औषध प्रशासनाने घेतली. वृत्ताची दखल ‘एफडीए’चे सहायक आयुक्त शरद कोलते यांनी घेतली. त्यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन दोन पथक तयार केले. दुपारी हे पथक इतवारी नंगा पुतळा ठिकाणी पोहचताच कारवाईला सुरुवात झाली. शनिवारी सायंकाळी उशिरापर्यंत कारवाई चालली. हातठेल्यांवर व किरकोळ हॉटेलमध्ये पाणीपुरी, वडे, समोसे, कचोरी, सांबारवडा, पावभाजी आदी खाद्य पदार्थ उघड्यावर व अस्वच्छ वातावरणात विक्रीला जात असल्याचे पाहून ‘एफडीए‘च्या पथकाला धक्काही बसला. त्यांनी यातील १७ विक्रेत्यांवर कारवाई करीत कारणे दाखवा नोटीस बजावली. या नोटीसवर विक्रेत्यांचे स्पष्टीकरण आल्यानंतर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. ही कारवाई २५ हजारापर्यंतची असणार आहे. खाद्य पदार्थांची तपासणी नियमित सुरू राहणार असल्याची माहिती कोलते यांनी दिली. ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त शशिकांत केकरे यांच्या मार्गदर्शनात सहायक आयुक्त शरद कोलते यांच्या नेतृत्वात अन्न सुरक्षा अधिकारी एम. डी. तिवारी, विनोद धवड, महेश चहांदे व आनंद महाजन यांनी केली.
लोकमत इम्पॅक्ट : नागपुरात खाद्यपदार्थांच्या १७ हातठेल्यांवर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2019 8:38 PM
उघड्यावर व घाणीत तयार करण्यात येत असेलल्या पाणीपुरीसह निकृष्ट दर्जाच्या खाद्यपदार्थांचे धक्कादायक वास्तव ‘लोकमत’ने शनिवारी उघडकीस आणताच खळबळ उडाली. अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) वृत्ताची दखल घेत इतवारी नंगा पुतळा परिसरातील पाणीपुरीसह खाद्यपदार्थांचे हातठेले, किरकोळ हॉटेल्सवर धाडी टाकल्या. यावेळी तपासणीत दोषी आढळून आलेल्या १७ विक्रेत्यांवर कारवाई करीत नोटीस बजावण्यात आली. उघड्यावर विकल्या जाणाऱ्या दूषित अन्नाचे नमुनेही घेण्यात आले.
ठळक मुद्दे‘एफडीए’ची कारवाई : नोटीस बजावली : दूषित अन्नाचे घेतले नमुने