नागपूर : महागाईसह पेट्रोलचे दर प्रती लिटर १२० रुपयांवर गेल्यानंतर सामान्य नागरिकांचे धाबे दणाणले आहे. एकाच वेळी १२० रुपयांचे पेट्रोल भरताना खिशाला झळ पोहोचत आहे. अशातच पंचशील चौकातील इंडियन ऑईलच्या पंचशील चौकातील एका पंपावर ५० रुपयांच्या खाली पेट्रोल मिळणार नाही, असे बोर्ड लावल्यानंतर नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण होते. काही नागरिकांनी कंपनीकडे तक्रार करण्याचे सूतोवाच केले होते. या बोर्डाची दखल ‘लोकमत’ने बातमी स्वरूपात घेतल्यानंतर पंपचालकाने रात्रीच बोर्ड हटविले. चूक लक्षात आली असून, ग्राहकाने कितीही रुपयांचे पेट्रोल भरावे, असे पंपचालकाचे मत आहे.
‘लोकमत’ने ७ एप्रिलच्या हॅलो नागपूरमध्ये ‘पेट्रोल इतकं महागलं की पंपवाले ५० रुपयांच्या खाली देईनात!’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल इंडियन ऑईल कंपनीने घेतली आहे. काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अ. भा. ग्राहक पंचायतचे गजानन पांडे म्हणाले, कितीही रुपयांचे पेट्रोल खरेदी करण्याचा ग्राहकांना अधिकार आहे. मालकाने पंपावर बोर्ड लावून ग्राहकांच्या अधिकाराचे उल्लंघन केले. याची तक्रार तेल कंपनी आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे करणार आहे.
‘लोकमत’च्या वृत्तानंतर नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया होत्या. पंपचालक असे बोर्ड लावू शकत नाही, असे त्यांचे मत आहे. कोरोनामुळे नोकरदाराचे उत्पन्न कमी झाले, तर दुसरीकडे महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशातच पंपचालक असे बोर्ड झळकावून नागरिकांची फसवणूक करीत आहे. यामुळे पुढे सर्वच पंपचालकांनी असे बोर्ड झळकाविले असते आणि नागरिकांची पंचाईत झाली असती. बोर्ड काढला, बरं झालं. नागरिकांना दिलासा मिळाला आहे. नागरिकांना वेठीस धरणारे पंप कंपनीने बंद करावे, असे नागरिकांचे मत आहे.
पंपावरील मशिन्स डिजिटल झाल्या आहेत. त्यामुळे नोजलमधून वेगाने पेट्रोल येते. अशावेळी ग्राहक गाडीत कमी पेट्रोल टाकल्याचे सांगून वाद घालायचे. त्यामुळे ५० रुपयांच्या खाली पेट्रोल मिळणार नाही, असा बोर्ड लावला होता. चूक लक्षात आली आणि बोर्ड बुधवारी रात्री हटविला आहे. ग्राहक कितीही रुपयांचे पेट्रोल भरू शकतात.
- रविशंकर पारधी, संचालक, पारधी अँड कंपनी, पंचशील चौक