नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : रेल्वे गाड्याच नव्हे तर प्रवाशांच्याही जिवाला धोका होणार नाही, रेल्वेचा अपघात होणार नाही, यासाठी स्वयंचलितपणे काम करणारे 'कवच' लवकरच दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या क्षेत्रात लावले जाणार आहे. तशा संबंधिची कागदोपत्री प्रक्रिया सुरू झाली आहे.
विशेष उल्लेखनीय म्हणजे, १७ जूनला पश्चिम बंगालमध्ये दार्जिलिंग जिल्ह्यात रेल्वेचा भीषण अपघात झाला होता. १० जणांचा जागीच जीव गेला होता तर पन्नासावर प्रवाशांना गंभीर दुखापत झाली होती. १८ जूनला लोकमतने 'अपघात रोखणारी कवच सिस्टम थंडबस्त्यात' अशा आशयाचे वृत्त ठळकपणे प्रकाशित केले होते. त्याची नागपूर ते दिल्ली सर्वत्र जोरदार चर्चा झाली. रेल्वे प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेत नागपूरसह ठिकठिकाणच्या रेल्वे मार्गावर आणि गाड्यांमध्ये 'कवच सिस्टम' लावण्यासंबंधाने हालचाली सुरू केल्या. या पार्श्वभूमीवर, दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील नागपूर-झारसुगुडा-बिलासपूर-रायपूर मार्गावर आणि रेल्वे गाड्यात तातडीने कवच सिस्टम लावण्यात यावी, असा प्रस्ताव दिल्लीला रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात आला. त्याला मंजूरी मिळताच कवच सिस्टम संबंधाने काम सुरू करण्यात येणार आहे.
असे आहे 'कवच'
दोन गाड्या एकाच ट्रॅकवर धावत असेल आणि लोको पायलटने वेळीच त्या सुरक्षित अंतरावर थांबवल्या नाही तर त्या एकमेकांना धडक देऊन मोठा अपघात घडतो. मात्र, तर 'कवच' सिस्टम कार्यान्वित केली असेल तर अतिउच्च रेडिओ फ्रिक्वेन्सीमुळे याच नव्हे तर ५ किलोमीटरच्या परिसरात वेगवेगळ्या रुटवर धावणाऱ्या गाड्यांचेही संरक्षण होते. चुकून कोणती ट्रेन रेड सिग्नल असतानाही धावत असेल तर त्या आणि त्या रुटवर धावणाऱ्या सर्व गाड्यांच्या लोको पायलटला, आजुबाजुच्या स्टेशन मास्टरला धोक्याची सूचना मिळते. एवढेच नव्हे तर पाच किलोमिटर परिसरातील सर्वच्या सर्व रेल्वेगाड्यांचे इंजिन काही वेळेसाठी आपोआप बंद पडते विशेष असे की, हे बहुगूणी 'कवच' पुर्णत: भारतीय बनावटीचे आहे.