लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ग्रीन एनर्जीला प्रोत्साहन देण्यासाठी घरांवर सोलर रुफ टॉप लावणाऱ्या घरगुती ग्राहकांना अखेर क्रेडिट ॲडजेस्टमेंटची रक्कम मिळायला सुरुवात झाली आहे. महावितरणने जूनमध्ये जारी होणाऱ्या बिलामध्ये या रकमेचा समावेश करून जिल्ह्यातील ३ हजारासह राज्यातील ३७,४७५ ग्राहकांना दिलासा दिला आहे.
सोलर रुफ टॉप लावल्यास नेट मीटरिंग केली जाते. महावितरणच्या वापरलेल्या पारंपरिक विजेसोबतच सोलर रूफ टॉपपासून तयार होणाऱ्या विजेचे रिडींग घेतले जाते. दोघांमधील विजेच्या फरकानुसार बिल दिले जाते. मार्च होताच वर्षभरात सोलर रूफ टॉपमधून झालेले अतिरिक्त विजेचे उत्पादन जोडले जाते. प्रति युनिट ३.५० रुपये या दराप्रमाणे अतिरिक्त उत्पादित रक्कम मे मध्ये येणाऱ्या बिलामध्ये सामावून दिली जाते. याला क्रेडिट ॲडजेस्टमेंट असे म्हटले जाते. परंतु मागच्या महिन्यात काेविड संक्रमणामुळे व्हेरिफिकेशन होऊ न शकल्याचा हवाला देत महावितरणने ही रक्कम गायब केली होती. यामुळे सोलर लावणाऱ्या ग्राहकांना मोठा फटका बसला. यासंदर्भात लोकमतने महावितरणची त्रुटी निदर्शनास आणून दिली. वृत्त प्रकाशित होताच कंपनीने १५ दिवसातच व्हेरिफिकेशनचे काम पूर्ण करीत रक्कम द्यायला सुरुवात केली.
असा झाला लाभ
साधारणपणे १ हजाार वर्गफुटाच्या छतावर लागलेले सोलर रूफ टॉप जवळपास २ हजार युनिटपर्यंत अतिरिक्त वीज उत्पादन करते. अशा परिस्थितीत ३.५० रुपये प्रति युनिट दराप्रमाणे ६५०० रुपयापर्यंतचा दिलासा अपेक्षित असतो. जूनमध्ये येणाऱ्या बिलामध्ये हा दिलासा प्रदान करण्यात आला आहे.