नागपूर : महाराष्ट्र एक्स्प्रेसमधून गोंदियाकडे जात असलेली ४१.२३ किलो चांदी रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) पकडली. चांदीची तस्करी केली जात असल्याचा संशय आहे. हे प्रकरण आता इन्कम टॅक्सकडे चौकशीसाठी देण्यात आले आहे.
सोने-चांदी आणि इतर मौल्यवान चीज वस्तूंची तस्करी होत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने गेल्या आठवड्यात प्रसिद्ध केले होते. तेव्हापासून रेल्वेतील सुरक्षा यंत्रणांनी तपासणीचे विशेष अभियान सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर विविध रेल्वेगाड्यांवर आणि संशयित व्यक्तींवर पोलिसांनी नजर रोखली आहे.
बुधवारी महाराष्ट्र एक्स्प्रेसमधून चांदीची तस्करी केली जात असल्याची माहिती आरपीएफला मिळाली होती. त्यानुसार ट्रेन नंबर ११०३९ महाराष्ट्र एक्स्प्रेस इतवारी रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक चार-पाचवर थांबताच रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी संशयित व्यक्तींची चौकशी सुरू केली. त्यांच्या ताब्यात तब्बल ४१.२३ किलो चांदी सापडली. संशयित आरोपी समाधानकारक उत्तर देत नसल्याचे पाहून आरपीएफने प्राप्तिकर खात्याच्या अधिकाऱ्यांना कारवाईची माहिती देऊन बोलावून घेतले. त्यानंतर ताब्यात घेतलेली सुमारे नऊ लाख रुपये किमतीची चांदी आणि संशयित आरोपीला प्राप्तिकर खात्याच्या ताब्यात देण्यात आले.
‘लोकमत’च्या वृत्तावर शिक्कामोर्तब
रेल्वे गाड्यांमधून रोज मोठ्या प्रमाणात सोने, चांदी आणि वेगवेगळ्या माैल्यवान चीज वस्तूंची तस्करी केली जाते. कोट्यवधींच्या हवालाच्या रकमेचीही हेरफेर होते. तस्करी करणारे एवढे सराईत असतात की, ते आपल्या वर्तनातून तपास यंत्रणेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना संशयच येऊ देत नाही. दरम्यान, या कारवाईमुळे ‘लोकमत’च्या वृत्तावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.