लोकमत न्यूज नेटवर्क
उमरेड : ‘लोकमत’च्या वतीने स्वातंत्र्य संग्राम सेनानी व ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक स्व. जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ‘लोकमत रक्ताचं नातं’ या मोहिमेंतर्गत उमरेड येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. तीत १३५ रक्तदात्यांनी रक्तदान करीत उदंड प्रतिसाद दिला. २ ते १५ जुलैदरम्यान ही महारक्तदानाची मोहीम राज्यभरात राबविली जात आहे.
उमरेड येथे नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष देवरावजी इटनकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उदय महिला सेवा संस्था, श्री साईनाथ रक्तपेढी, महात्मे नेत्र रुग्णालय आणि ‘लोकमत’च्या सहकार्याने या शिबिराचे यशस्वी आयोजन केल्या गेले. स्व. देवरावजी इटनकर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत पार पडलेल्या या शिबिरात ७६९ जणांची नेत्रतपासणीसुद्धा केल्या गेली. यापैकी १८६ लोकांना मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी नागपूरला पाठविले जाणार आहे.
यावेळी नागपूर जिल्हा कॉँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र मुळक, आ. राजू पारवे, पालिकेचे माजी नगराध्यक्ष गंगाधर रेवतकर, नगर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुरेश पौनीकर, माजी नगराध्यक्षा सुमन इटनकर, माजी नगरसेवक सूरज इटनकर, नगरसेवक सुरेश चिचमलकर, विशाल देशमुख, नगरसेविका योगिता इटनकर, रंजना बारेकर, जिल्हा संघटन सचिव मधुकर लांजेवार, संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष जितेंद्र गिरडकर, कांचन रेवतकर, रितेश राऊत, मंगेश गिरडकर, अमित लाडेकर, राकेश नौकरकर आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
लोकमत ‘रक्ताचं नातं’ या उपक्रमाचे मान्यवरांनी कौतुक केले. स्व. देवरावजी इटनकर यांच्या सामाजिक योगदानाचे स्मरण केल्या गेले. त्यांच्या राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक कार्यावर प्रकाश टाकण्यात आला. ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने कोविड चाचणीसुद्धा केल्या गेली. रक्तदात्यांना उदय महिला सेवा संस्थेच्या वतीने नि:शुल्क हेल्मेट भेट देण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूरज इटनकर यांनी केले. संचालन प्रशांत गिरडकर यांनी केले. आभार संजय गायकवाड यांनी मानले.
-- लोकमत ‘रक्ताचं नातं’ या उपक्रमांतर्गत रक्तदान शिबिरात उपस्थित नागपूर जिल्हा ग्रामीणचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र मुळक, आमदार राजू पारवे आणि इतर.