लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गणेशपेठ बसस्थानकावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. मागील अनेक महिन्यांपासून हे खड्डे बुजविण्यासाठी एसटी महामंडळ प्रशासनाने काहीच कारवाई केलेली नाही. यामुळे प्रवाशांना बस आदळल्यामुळे पाठदुखीचा त्रास होत असून एसटी बसेस पंक्चर होणे, बसेसच्या स्प्रिंगचे पट्टे तुटणे असे नुकसान होत आहे. यामुळे हे खड्डे त्वरित बुजविण्याची मागणी होत आहे.
गणेशपेठ बसस्थानकावरून दररोज ११०० बसेस आणि ३० हजार प्रवासी प्रवास करतात. परंतु बसस्थानकावर मोठमोठे खड्डे पडले आहे. गणेशपेठ आगारात प्रवेश करतानाच दोन मोठमोठे खड्डे आहेत. या खड्ड्यात जोरात बस आदळते. याशिवाय बसस्थानकाच्या बाहेर बस पडत असलेल्या भागातही मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यातून बस गेल्यानंतर प्रवाशांना जोरात झटका बसतो. यामुळे त्यांना पाठदुखीचा त्रास होत आहे. या शिवाय बसेस पंक्चर होणे, स्प्रिंगचे पट्टे तुटणे, बसेसचा पत्रा खिळखिळा होत आहे. या खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे हे खड्डे त्वरित बुजविण्याची गरज निर्माण झाली आहे. मागील अनेक महिन्यांपासून हे खड्डे बुजविण्यासाठी एसटी प्रशासनाने कोणतेच पाऊल उचललेले नाही. त्यामुळे बसेसचे होत असलेले नुकसान आणि प्रवाशांच्या आरोग्यासाठी एसटी प्रशासनाने त्वरित कारवाई करण्याची मागणी होत आहे.
खड्ड्यांमुळे पाठीचे आजार वाढले
रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे दुचाकीचालकांना तसेच चारचाकी वाहनांमधील प्रवाशांना मानेचे, पाठीचे विकार उद्भवत आहेत. याला वैद्यकीय भाषेत `स्पाईन रिपेटिटीव्ह ट्रॉमा` म्हणतात. चालताना खड्ड्यात पाय पडून मुरगळण्याच्या व वाहने अडकून अपघाताच्या घटनाही वाढल्या आहेत. झटक्यामुळे मानेच्या विकाराचे आणि त्यामुळे चक्कर येणारे रुग्ण दिसून येत आहेत.
डॉ. संजीव चौधरी, अस्थिरोगतज्ज्ञ