लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सप्तसुरांची उधळण आणि प्रतिभावंत संगीत साधकांचा सन्मान करीत ‘लोकमत’चा नववा सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार-२०२२ सोहळा बुधवारी सायंकाळी रेशिमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात रंगला. तब्बल चार तास स्वर-तालांची चिंब बरसात करत कलावंतांनी नागपूरकर रसिकांवर मोहिनी घातली. उत्तरोत्तर मिळणारी दाद, टाळ्यांची बरसात आणि नेटके नियोजन यामुळे हा सोहळा अविस्मरणीय ठरला.
माजी केंद्रीय मंत्री खासदार प्रफुल्ल पटेल, माजी मुख्यमंत्री व महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, दी वायरचे संस्थापक-संपादक सिद्धार्थ वरदराजन, ॲक्सिस बँकेच्या व्हाईस प्रेसिडेंट अमृता फडणवीस आणि लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा, लोकमत वृत्तपत्र समूहाचे एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सन्मान सोहळ्यात युवा गायिका शाल्मली सुखटणकर व युवा सतारवादक मेहताब अली नियाजी यांना नववा लोकमत सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रत्येकी एक लाख रुपयांचा धनादेश, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
यावेळी व्यासपीठावर माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर, माजी मंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे, ब्राईट आऊटडोअर मीडिया प्रा. लि.,चे सीएमडी योगेश लखानी, जळगावचे माजी महापौर रमेशदादा जैन यांच्यासह सूर ज्योत्स्ना संगीत पुरस्काराच्या ज्युरीमधील प्रसिद्ध गायक रूपकुमार राठोड, पंडित शशी व्यास, टाईम्स म्युझिकच्या गौरी यादवडकर तसेच लोकमत सखी मंचच्या अध्यक्षा आशू दर्डा, लोकमत समूहाचे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा उपस्थित होते.
गतवर्षीचा लोकमत सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार विजेता लिडियन नादस्वरम् याचे ड्रम व ड्युएल पियानोवादन, यंदाची पुरस्कार विजेती गायिका शाल्मली सुखटणकर व सतारवादक मेहताब अली नियाजी यांचे गायन व वादन आणि त्यावर कळस ठरलेले कौशिकी चक्रवर्ती व चमूचे इंडो-वेस्टर्न क्लासिकल फ्युजन, असे यंदाच्या आयोजनाचे वैशिष्ट्य होते.
शाल्मलीचे गायन अन् मेहताबचे सतारवादन
पुरस्कार विजेती शाल्मली सुखटणकर हिचे गायन आणि मेहताब अली नियाजी याचे सतारवादन ही संगीतरसिकांसाठी अपूर्व मेजवानीच होती. शाल्मलीने तिच्या गोड गळ्यातून स्वर आळवताच टाळ्यांचा पाऊस पडला. ‘कहीं ये वो तो नहीं, लग जा गले, संवार लू, निगाहे मिला ने को दिल चाहता है’ आणि ‘आयुष्य हे कांदेपोहे’ ही गाणी सादर करीत रसिकांच्या मनाला सुखद धक्का दिला.
मेहताब अली नियाजी याचे सतारवादन रसिकांना आगळीच संगीत मेजवानी देऊन गेले. सतारीवर लीलया फिरणाऱ्या त्याच्या बोटांनी स्वरांची करतब दाखविली. भिंडी बाजार घराण्याचा संगीतसाधक असलेला मेहताब गातोही सुरेख ! त्याने सतारवादनात राग मिश्र खमाज व राग मालिका सादर केला. प्रसिद्ध तबलावादक ओजस अडिया यांनी साथसंगत केली.
लिडियनच्या नाद स्वरमने रसिक चकित
आठव्या लोकमत सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्काराचा विजेता लिडियन नाद स्वरम याचे या सोहळ्यात विशेष सादरीकरण झाले. त्याने ड्रम, ड्युएल पियानोचे आणि लूप मशीनचे एकाच वेळी वादन करत रसिकांना चकित केले. टाळ्यांच्या गजरात नागपूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
लोकमत सूर ज्योत्स्ना पुरस्काराची देशभरात ओळख
विधानसभेतील विरोध पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, ज्योत्स्ना दर्डा या सुरांच्या साधक होत्या व स्वरांच्या माध्यमातून त्यांनी अनेकांना संस्कारित केले. त्या अतिशय कुशल संघटक होत्या. सखी मंचमधून महिलाशक्तीला प्रोत्साहन दिले. देशातील प्रतिभांना सन्मानित करण्यासाठी ‘लोकमत’ने पुढाकार घेतला व या कलावंतांनी देशाची मान उंचावली आहे. यापूर्वीचे विजेते देशगौरव झाले आहेत. लोकमत सूर ज्योत्स्ना पुरस्काराची देशातील प्रतिष्ठित पुरस्कार अशी ओळख निर्माण झाली आहे.
देवेंद्र फडणवीस, विधानसभा विरोधी पक्ष नेता
देशातील कलावंतांचा हक्काचा मंच
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खा. प्रफुल्ल पटेल म्हणाले, लोकमत सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय पुरस्काराच्या प्रत्येक कार्यक्रमाला मी आवर्जून उपस्थित राहतो. हा एक भावनात्मक कार्यक्रम आहे. कलेच्या क्षेत्रात देशाच्या कोनाकोपऱ्यातील हिरे शोधून त्यांना ‘लोकमत’ने हक्काचा मंच प्रदान केला आहे. त्यांचे भविष्य बनविण्याचे कार्य या माध्यमातून होत आहे. हा पुरस्कार केवळ नागपूरपुरताच मर्यादित नाही, तर देशभरात याची चर्चा होते.
खा. प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादी काँग्रेस नेते
संगीताशी जुळला तो खऱ्या अर्थाने आयुष्याशी जुळला
‘लोकमत’च्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन, माजी खासदार विजय दर्डा म्हणाले, संगीत ही साधना आहे. त्यामुळे जो संगीताशी जुळला तो खऱ्या अर्थाने आयुष्याशी, मानवतेशी जुळला. गायिका लता मंगेशकर यांचे संगीतामधील कार्य अजरामर आहे. ती पोकळी कधीही भरता येणे शक्य नाही. ज्युरीमध्ये त्यांचे बंधू हृदयनाथ मंगेशकरही असल्याचा आदरपूर्वक उल्लेख त्यांनी केला. स्व. ज्योत्स्ना दर्डा यांचे संगीतावर अफाट प्रेम होते. लहानपणापासूनच त्या संगीताच्या उपासक होत्या. यामुळे संगीत साधनेतून त्यांची पोकळी भरून काढण्याचा हा प्रयत्न आहे.
विजय दर्डा, चेअरमन, लोकमत एडिटोरियल बोर्ड