नागपूर : वेगाने बदलणाऱ्या काळाचा साक्षीदार असलेल्या स्त्रीचे अस्तित्व हा समाजाचा आरसा आहे. त्यामुळे तिचे अस्तित्व, अभिव्यक्ती, 'ती' च्या नजरेतून जाणून घेण्यासाठी लोढा गोल्ड टीएमटी बार प्रस्तुत लोकमततर्फे पिजन आणि निर्मल उज्ज्वल क्रेडिट को-ऑप. सोसायटी लि., नागपूर यांच्या सहकार्याने लोकमत वुमेन समिटचे नववे पर्व शनिवारी (दि. १४) नागपुरात हाटेल सेंटर पॉईंट येथे आयोजित करण्यात आले आहे.
अन्याय, अत्याचारग्रस्त, शोषणाच्या बळी ते स्वत:च्या कर्तृत्वाच्या जोरावर विविध क्षेत्रांत उत्तुंग भरारी घेणाऱ्या महिलांचा प्रवास (उडने की आशा) या संकल्पनेतून उलगडणार आहे. राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, ग्रॅव्हिटास फाऊंडेशनच्या अध्यक्षा उषा काकडे, निर्मल उज्ज्वल क्रेडिट को ऑप. सोसायटी लि. नागपूरचे संस्थापक प्रमोद मानमोडे यांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार आहे. लोकमत एडिटोरिअल बोर्डचे चेअरमन विजय दर्डा अध्यक्षस्थानी असतील.
परिषदेत राज्य महिला आयोगाच्या 'अध्यक्षा रूपाली चाकणकर, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंह, भारतीय मुस्लीम महिला आंदोलनाच्या संस्थापक झाकिया सोमण, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इनोव्हेशन इन्क्युबेशन सेंटरच्या संचालक डॉ. अपूर्वा पालकर, एअर इंडिया लिमिटेडच्या कॅप्टन शिवानी कालरा, बालतस्करी विरोधात काम करणाऱ्या कार्यकर्त्या सुनीता कार, अभिनेत्री ईशा कोप्पीकर, अभिनेत्री रसिका दुग्गल, संजना संघी, अलोपेसियाग्रस्त महिलांसाठी लढा देणाऱ्या कार्यकर्त्या केतकी जानी यावेळी उपस्थित राहणार आहेत.
आपल्या असीम कर्तृत्वाने जगाला अचंबित करणाऱ्या स्त्रीचे अस्तित्व तिच्याच नजरेतून जाणून घेण्याची संधी लोकमत माध्यम समूहाने उपलब्ध करून दिली आहे. आजवरच्या स्थित्यंतरांमध्ये प्रत्येक स्त्रीने वैचारिक क्रांती घडवून आणत विचारांतून आणि कृतीतून मोलाचे योगदान दिले. तिच्या प्रवासातील नानाविध कंगोरे 'उडने की आशा' या संकल्पनेतून उलगडणार आहेत.
महिला सक्षमीकरणाची चळवळ उभी करणाऱ्या कर्तबगार महिला आजवर 'लोकमत'च्या वुमन समिट या राष्ट्रीय परिषदेमध्ये सहभागी झाल्या आहेत. याच यशोगाथेचा पुढील टप्पा म्हणून स्त्रीत्वाचा अनोखा आविष्कार यंदाच्या अनुभवायला वुमन समिट'मध्ये मिळणार आहे. महिलांच्या सर्व क्षेत्रांतील गरुडझेपेचा हा प्रवास 'लोकमत वुमेन समिट'मध्ये विविध परिसंवादांच्या माध्यमातून उलगडणार आहे. गोयल गंगा ग्रुप ग्लोकल स्क्वेअर सहयोगी प्रायोजक आहेत.
सेवाव्रतींचा होणार गौरव
विधायक पत्रकारितेचा वसा जपताना समाजातील मांगल्याला, सेवाभावाला वृद्धिंगत करणाऱ्या महिलांचा 'लोकमत वुमेन समिट'मध्ये गौरव होणार आहे. महात्मा गांधी, विनोबा भावे आणि साने गुरुजी यांच्या विचारांनी प्रभावित होऊन सामाजिक कार्य करणाऱ्या गोवर्धन येथील निर्मल ग्राम केंद्राच्या संचालक नलिनी नावरेकर यांना 'मातोश्री वीणादेवी दर्डा जीवनगौरव' पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
आदिवासी महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण करण्यासाठी सातत्याने कार्यरत असणाऱ्या, त्यांच्या सांस्कृतिक संवर्धनासाठी प्रयत्न करणाऱ्या नगरच्या रत्नाताई कांबळे यांना 'सौ. ज्योत्स्ना दर्डा कार्यगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याची घोषणा लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन विजय दर्डा यांनी केली.
महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने देशपातळीवर होत असलेल्या कार्याला व्यासपीठ मिळवून देताना आपल्या कार्यकर्तृत्वाने समाजापुढे दीपस्तंभ असणाऱ्यांचा गौरव 'लोकमत'च्यावतीने करण्यात येणार आहे. दर्डा म्हणाले, "लोकमतचे संस्थापक जवाहरलालजी दर्डा यांनी मूल्ये आणि तत्त्वांचा जागर करीत समाजहितैषी परिवर्तनाच्या भूमिकेचा पुरस्कार केला आहे. याच भूमिकेतून हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे."
गरुडभरारीला विचारांचे बळ
'लोकमत'ने नेहमीच विचारांचा जागर करताना त्याला कृतिशीलतेचीही जोड दिली आहे. आजच्या 'वूमेन समिट'ची संकल्पना आहे 'उड़ने की आशा उत्तुंग झेप घेण्याचे स्वप्न. या स्वप्नांना बळ देण्यात 'लोकमत'चा सहभाग असावा यासाठी १९९९ साली माझी सुविद्य पत्नी सौ. ज्योत्स्ना दर्डा यांच्या कल्पनेतून १९९९ मध्ये 'लोकमत सखी मंचची स्थापना करण्यात आली. महिलांच्या अभिव्यक्तीला मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देताना त्यांच्या पंखांना ताकद देण्याचे काम सखी मंचने केले आहे. विचारांच्या या अभिव्यक्तीचा देशपातळीवर जागर व्हावा, यासाठी सौ. ज्योत्स्ना यांच्या प्रेरणेतून पुण्यात 'लोकमत वुमेन समिट'ची सुरुवात झाली. राज्याच्या विविध भागांतून आलेल्या सखींचे ग्रुप पाहून सौ. ज्योत्स्ना यांचे स्वप्न साकार झाल्याची अत्यंत कृतज्ञ भावना माझ्या मनात आहे.
नेतृत्वाची झेप घेणारी नव्या युगाची महिला घडण्याची प्रक्रिया यामुळे अधिक गतिमान होणार आहे. आज प्रत्येक क्षेत्रात महिलांनी स्वत:च्या जिद्दीने नवे आयाम दिले आहेत. त्यातून महिलांचाच नव्हे, तर संपूर्ण समाजाचा परीघ विस्तारला आहे. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन 'उड़ने की आशा' प्रत्येक महिलेच्या मनात निर्माण होईल, असा मला विश्वास आहे.
विजय दर्डा, चेअरमन, लोकमत एडिटोरियल बोर्ड
लोकमत सखी सन्मान राज्यस्तरीय पुरस्कार !
'लोकमत'च्यावतीने राज्यपातळीवर 'लोकमत सखी सन्मान' पुरस्कारांचे वितरणही या वेळी होणार आहे. यंदाच्या वर्षीचे पुरस्कारार्थी
सामाजिक : डॉ. स्मिता कोल्हे (अमरावती)
शैक्षणिक : मीनाताई जगधने (नगर)
शौर्य : मोहिनी भोगे (सोलापूर)
क्रीडा : साक्षी चितलांगे (औरंगाबाद)
आरोग्य : डॉ. तारा माहेश्वरी (अकोला)
व्यवसाय - उद्योग : रश्मी कुलकर्णी (नागपूर)
सांस्कृतिक : रागिणी कामतीकर (नाशिक)