नागपूर : लोकमत सखी मंच आणि एमपीओसीच्या वतीने सीताबर्डी येथील रामगोपाल माहेश्वरी सभागृहात सखींसाठी ‘फूल टू धमाल, फूड विथ मूड’ या औचित्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सखींनी उत्साहात सहभाग घेत कुकरी, गेम शो, डान्स शोसह विविध स्पर्धांत सहभाग घेत मनोरंजन केले. सखींनी स्पर्धेतून बक्षिसांची लयलूट केली.
या कार्यक्रमात ‘चंद्र आहे साक्षीला’ व ‘नांदा सौख्य भरे’ या मालिकांतून घरोघरी पोहोचलेली सुप्रसिद्ध अभिनेत्री ऋतुजा बागवे उपस्थित झाली होती. यावेळी ऋतुजाने कार्यक्रमात उपस्थित सर्व सखींशी मनमोकळा संवाद साधत मालिकांतील आपले कॅरेक्टर्स आणि वैयक्तिक विचारांचे आदानप्रदान केले. यासोबतच तिने सखींसोबत गाणेही गायले. यावेळी सुप्रसिद्ध शेफ नीरज जैन यांनी ‘कुकरी शो’मधून सखींना फलाहारी बास्केट, चाट पोटॅटो, पिझ्झा पॅटीस, पाश्ता, कबाब रोल आदी व्यंजने बनविणे शिकवले. यात सखींनी भरभरून प्रतिसाद दिला. नीरज जैन यांनी पाककृती शिकविताना एमपीओसी म्हणजेच मलेशियन पाम ऑइलबद्दल माहिती दिली. हे तेल आरोग्यासाठी लाभदायक असून, पचायला कसे हलके आहे आणि तळलेला पदार्थ तेलकट होत नाही हे सांगितले आणि हे तेल व्हिटॅमिन ई-युक्त व पोषणाने भरपूर असल्याचे ते म्हणाले.
सखींसाठी पाककृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तळलेला पदार्थ घरूनच करून आणायचा होता. यात सर्वच सखींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. स्पर्धेनंतर कोरोना संक्रमणाचा ऊब सुटण्यासाठी म्हणून मनोरंजनाची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी सुप्रसिद्ध आरजे राजन याने विशिष्ट शैलीत हौजी हंगाम व म्युझिकल गेम शो घेतला. यात सखींनी सहभाग घेत बक्षिसांची लयलूट केली. यावेळी प्रत्येक सखीला मिनर्वा ज्वेलर्सकडून गोल्ड प्लेटेड ईअर रिंग्ज भेट म्हणून देण्यात आले. या सोहळ्याला ऋतुजा बागवे हिच्यासोबतच सुप्रसिद्ध वास्तूतज्ज्ञ व रेकी मास्टर डॉ. दीपा नंदनवार, डॉ. प्रीती मानमोडे, शेफ अपर्णा कोलारकर, जया अंभोरे, मिनर्वा ज्वेलर्सच्या वृषाली जैन आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन नेहा जोशी यांनी केले, तर सहकार्य रोशनी शेगावकर व वसुधा गुले यांनी केले.
कुकिंग कन्टेस्टंट विजेत्या
कुकिंग स्पर्धेत संध्या वरघडे प्रथम, देवयानी कुसरे द्वितीय, तर दीपाली डिवरे तृतीय क्रमांकाने विजेत्या ठरल्या. चौथा क्रमांक कोमल शर्मा, पाचवा क्रमांक कविता कांबळे, सहावा क्रमांक मनीषा पंडित, तर सातवा क्रमांक सारा लांजेवार यांनी पटकावला. या सर्व विजेत्यांना विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले.
..............