लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रक्तदानाबाबत लोकांमध्ये असलेले गैरसमज दूर करण्यासाठी तसेच जास्तीत जास्त लोकांना रक्तदानासाठी प्रेरणा मिळावी यासाठी ‘लोकमत’ने ‘इस बार चलो रक्तदान करो...’ हे गाणे तयार केले आहे. हे गाणे तरुणांना विशेष प्रेरणा देत आहे. आपल्या शरीरात वाहणाऱ्या रक्तावर केवळ आपलाच अधिकार नाही, तर संकटप्रसंगी गरजूंच्या देखील ते कामी आले पाहिजे, हा संदेश या गाण्याच्या माध्यमातून देण्यात आला आहे. सर्वांनी स्वार्थाचा त्याग करत रक्तदान करण्याची प्रेरणा हे गाणे देत आहे.
रक्तदात्यांना प्रेरणा देणारे हे गीत २ जुलै रोजी ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी व ‘लोकमत’चे संस्थापक संपादक स्व. जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त तयार करण्यात आले आहे. याच दिवशी प्रमुख अतिथींच्या हस्ते या गीताचे लाँचिंग करण्यात येणार आहे. ‘लोकमत’च्या ‘लोकमत रक्ताचं नातं’ या मोहिमेंतर्गत २ ते १५ जुलैदरम्यान हा उपक्रम राबविण्यात येईल, हे विशेष. या माध्यमातून विविध ठिकाणी महारक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.
रक्तदानासाठी प्रेरणा देणाऱ्या गाण्याच्या ओळी लोकमत समाचारचे सहायक उपाध्यक्ष मतीन खान यांनी लिहिल्या आहेत. तर गायक आदित्य सालनकर यांनी याला स्वर दिला आहे. आदित्यनेच निखिल जॉर्जसह या गाण्याचे कंपोजिंग केले आहे.
कोण आहेत आदित्य व निखिल
आदित्य सालनकरने गायलेली दोन गाणी प्रसिद्ध झाली आहेत. चित्रपटसृष्टीतील नावाजलेले डीजे सुकेतू, इरिक पिल्लई, कल्याण बरुआ आणि फातिमा सना शेखसोबत आदित्यने काम केले आहे. सोशल मीडियावर आदित्यच्या आवाजाचा बोलबाला असून यूट्यूबवर आदित्यला ८ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. निखिल जॉर्जदेखील चित्रपटसृष्टीशी अनेक वर्षांपासून जुळले आहेत. त्यांनी प्रीतम दा सोबत देखील काम केले आहे. बर्फी या चित्रपटातील दोन प्रसिद्ध गाण्यांचे गायन त्यांनी केले आहे. शुभम चोपकरने बासरी वादन केले आहे. कोरसमध्ये अनुजा घाडगे, रियाजी, साहित्य सिंघई, निखिल पॉल जॉर्जने साथसंगत केली आहे. या गाण्याची निर्मिती एनजीपी म्युझिकने केली आहे. याचे प्रकल्प व्यवस्थापक मोहित मनुजा हे आहेत. सागर अगलेने मिक्सिंगचे काम केले आहे, तर गाण्याचे रेकॉर्डिंग साहित्य सिंघईने केले आहे.