नागपूर : ‘लोकमत’चे प्रथम संपादक पत्रपंडित पा. वा. गाडगीळ आणि ‘लोकमत’चे द्वितीय संपादक पत्रमहर्षी बाबा दळवी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार वितरण समारंभ बुधवार, दि. २३ मार्चला दुपारी तीन वाजता हॉटेल सेंटर पाॅइंट येथे आयोजित करण्यात आला आहे. पुरस्काराचे हे यंदाचे ३३ वे वर्ष आहे.
पंजाबचे राज्यपाल तथा चंदीगडचे प्रशासक बनवारीलाल पुरोहित यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या समारंभाला द वायरचे संस्थापक संपादक, ज्येष्ठ पत्रकार सिद्धार्थ वरदराजन हे प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. ‘युक्रेन संघर्ष : भारतासह जगावर आणि माध्यमांवर होणारा परिणाम’ असा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे.
अतिथी म्हणून नागपूरच्या विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा राहतील. ‘लोकमत’ एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन आणि माजी राज्यसभा सदस्य विजय दर्डा यांचीही यावेळी प्रामुख्याने उपस्थिती राहणार असून, माजी उद्योग व शालेय शिक्षणमंत्री तथा ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ होणार आहे.
पा. वा. गाडगीळ आर्थिक विकास लेखन स्पर्धेंतर्गत उत्कृष्ट लिखाण पाठविणाऱ्या पहिल्या तीन लेखकांना अनुक्रमे २५ हजार रुपये, २० हजार रुपये आणि १५ हजार रुपये रोख रक्कम, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्र पुरस्कार स्वरुपात देण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी आलेले लेख व वृत्तांचे बाहेरील निष्पक्ष संपादकांकडून परीक्षण करून त्यांनी निवडलेल्या स्पर्धकांना हे पुरस्कार दिले जातात. गेल्या तीन वर्षांतील एकूण १८ लेखक व पत्रकारांना यावेळी हे पुरस्कार देण्यात येतील.
राज्यभरातील विशेषत: ग्रामीण भागातील पत्रकार, लेखक यांच्यातील प्रतिभेला वाव मिळावा, त्यांना कसदार पत्रकारिता करता यावी आणि वृत्तपत्रांचा दर्जा उंचावत राहावा, या उद्देशाने ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाच्या वतीने हा उपक्रम अव्याहतपणे राबविला जात आहे. आपल्या संपादकांच्या स्मृतिप्रीत्यर्थ असा उपक्रम राबविणारे ‘लोकमत’ हे देशातील पहिलेच वृत्तपत्र मानले जात आहे.