नागपूर : मागील काही काळात नागपूरमध्ये आमूलाग्र बदल झाला असून, प्रचंड विकास झाला आहे. नागपूरसह देशाच्या प्रगतीत ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाने नेहमीच साथ दिली असून, समाजातील सर्वच क्षेत्रांतील कर्तृत्ववान लोकांना प्रोत्साहन मिळावे यासाठी सहकार्याचा हात दिला आहे, असे कौतुकोद्गार भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी काढले. मंगळवारी ‘लोकमत टाइम्स जनरेशन नेक्स्ट’ पुरस्कारांचे थाटात वितरण झाले. त्यावेळी ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते.
रामदासपेठ येथील हॉटेल सेंटर पॉइंट येथे झालेल्या कार्यक्रमाला ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाच्या ‘एडिटोरिअल’ बोर्डाचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा, प्रसिद्ध चित्रपट अभिनेते स्वप्नील जोशी, आर.सी. प्लास्टो टँक्स अँड पाइप्स प्रा.लि.चे संचालक, तसेच ‘व्हीआयए’चे अध्यक्ष विशाल अग्रवाल प्रामुख्याने उपस्थित होते. देशाच्या प्रगतीत तरुण पिढीचा मोठा हातभार आहे व त्यांना ऊर्जा देण्यासाठी ‘लोकमत’कडून नेहमीच पुढाकार घेण्यात येतो. ‘लोकमत’कडून समाजातील विविध क्षेत्रांत सातत्याने संशोधन करण्यात येऊन त्या क्षेत्रांतील हिऱ्यांना समाजासमोर आणले जाते.
‘लोकमत’ने नेमकी वस्तुस्थिती समाजात पोहोचवून सगळीकडेच आपली छाप पाडली आहे. खरे तर ‘डिजिटल’ युगात वर्तमानपत्र चालविणे हे आव्हान आहे. मात्र, ‘लोकमत’मध्ये सर्व वर्गाला स्थान मिळते. आम्हालादेखील ‘लोकमत’ हातात घेतल्यावरच पुढील योजना आखता येतात, असे बावनकुळे म्हणाले. यावेळी विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तरुण पिढीतील कर्तृत्ववान मान्यवरांचा ‘लोकमत टाइम्स जनरेशन नेक्स्ट’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला. आसमान सेठ यांनी प्रास्ताविक मांडले. श्वेता शेलगावकर यांनी संचालन केले.
‘लोकमत’च्या जाहिरातीतून नवी सुरुवात : अग्रवाल
यावेळी विशाल अग्रवाल यांनी ‘लोकमत’ आणि त्यांच्या नात्यावर भाष्य केले. ‘लोकमत’मध्ये मी अगोदर एक लहानशी जाहिरात दिली होती. मात्र, ‘लोकमत’चा विस्तार लक्षात घेता मी पूर्ण पानाची जाहिरात देण्याची हिंमत केली. तेव्हापासून कंपनीने प्रगतीची अनेक शिखरे पादाक्रांत केली, असे अग्रवाल म्हणाले.
तरुण पिढीच देशाची स्फूर्ती अन् भक्ती : दर्डा
‘लोकमत’ने नेहमी समाजातील सर्वच लोकांसाठी काम केले आहे. समाजातील सकारात्मक कामाचा सन्मान करण्यासाठी ‘लोकमत’ने नेहमीच पुढाकार घेतला आहे. पुरस्कार कोण देत आहे आणि कोणाचा सन्मान होत आहे ही बाब महत्त्वाची असते. पंतप्रधानांच्या स्वप्नाप्रमाणे देशाला विश्वगुरू करायचे असेल तर तरुण पिढीला समोर यावे लागेल. तरुण पिढीच देशाची स्फूर्ती व भक्ती आहे, असे प्रतिपादन विजय दर्डा यांनी केले.
‘लोकमत’चा पाठीवर हात विश्वास देणारा : जोशी
नव्या दमाच्या तरुणांची पाठ थाेपटणे त्यांना आणखी चांगले काम करण्याची प्रेरणा व ऊर्जा देऊन जाते. मात्र, ही पाठ काेण थाेपटताे, हेही महत्त्वाचे असते. लाेकमत समूह एक ब्रँड आहे आणि अशा समूहाने पुरस्कार दिल्याने एक विश्वास जाेडला जाताे, अशी भावना स्वप्नील जाेशी यांनी व्यक्त केली.