अलाहाबाद बँक- एसजेएएन आंतर प्रेस क्रिकेट सामने सुरूनागपूर : गतविजेत्या लोकमत संघाने पहिल्याच सामन्यात टाइम्स आॅफ इंडिया संघाचा २२ धावांनी पराभव करीत शनिवारपासून सुरू झालेल्या १७ व्या अलाहाबाद बँक-एसजेएएन आंतर प्रेस क्रिकेट स्पर्धेत विजयी सलामी दिली. स्पोर्ट्स जर्नलिस्ट असोसिएशन आॅफ नागपूरतर्फे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून अलाहाबाद बॅँक हे प्रायोजक तर मोशन ट्युटोरियल्स सहप्रायोजक आहेत.दीक्षाभूमी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर कॉलेज क्रीडांगणावर झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या लोकमतने २० षटकांत सहा गड्यांच्या मोबदल्यात १५७ धावा उभारल्या.सामनावीर घोषित झालेला देवेंद्र सदावर्ती याने दोन चौकारांसह ३५ तसेच कर्णधार अमित खोडके याने पाच चौकारांसह ३० धावांचे योगदान दिले. सलामीचा शरद मिश्रा लवकर बाद झाल्यानंतर खोडके - नितीन पटारिया (२६) यांनी दुसऱ्या गड्यासाठी ५६ धावांची भागीदारी केली. नितीन श्रीवास यानेही २३ धावा फटकावल्या. टीओआयकडून पीयूष पाटीलने १६ धावांत ३ गडी बाद केले.प्रत्युत्तरात टीओआय संघाला २० षटकांत ८ बाद १३५ धावा करता आल्या. सुबोध रत्नपारखी(३८) आणि सुहास नायसे(२४) या दोन्ही सलामीवीरांनी ५७ धावा करीत झकास सुरुवात करून दिली पण अन्य फलंदाजांच्या कचखाऊ वृत्तीमुळे संघाला पराभवाचा फटका बसला. लोकमतकडून शरद मिश्रा याने सामन्याचे चित्र पालटताना १४ धावांत ४ गडी बाद केले. देवेंद्र सदावर्ती आणि नितीन पटारिया यांनी प्रत्येकी दोन गडी टिपले.त्याआधी सकाळी सामन्याचे उद्घाटन अलाहाबाद बँकेचे झोनल हेड के. मुरलीकृष्णा यांच्याहस्ते झाले. यावेळी मोशन ट्युटोरियल्सचे संचालक प्रमोद वालमांडरे, डॉ. आंबेडकर कॉलेजचे उपप्राचार्य डॉ. अरविंद जोशी आणि यश ग्रूपचे संचालक यशवंत केऱ्हळकर यांची विशेष उपस्थिती होती. एसजेएएन अध्यक्ष डॉ. राम ठाकूर यांनी संचालन केले. सचिव किशोर बागडे यांनी आभार मानले. उद्या रविवारी डॉ. आंबेडकर कॉलेज मैदानावर सकाळी ९.३० पासून सकाळविरुद्ध हितवाद आणि वसंतनगर मैदानावर पुण्यनगरीविरुद्ध लोकशाही वार्ता हे सामने खेळविले जातील.(क्रीडा प्रतिनिधी)
लोकमतची विजयी सलामी
By admin | Published: December 28, 2014 12:40 AM