१.०६ कोटी युनिटची बचत : पाच महिने राबविले अभियाननागपूर : रेल्वेचे लोकोपायलट केवळ प्रवाशांना सुखरूप त्यांच्या गावी पोहोचवित नसून सामाजिक जबाबदारी पार पाडत आहेत. मागील पाच महिन्यात मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक बृजेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या विशेष अभियानात लोको पायलटने १.०६ कोटी युनिट विजेची बचत करून ५.१३ कोटी रुपयांची बचत केली आहे. हे अभियान एप्रिल ते आॅगस्टदरम्यान राबविण्यात आले.मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने मागील वर्षी रेल्वेगाड्या चालविण्यासाठी ४०६ कोटी रुपयांच्या ५६.४३ कोटी विजेच्या युनिटचा वापर केला होता. परंतु या वर्षी विभागीय रेल्वे व्यवस्थापक बृजेश कुमार गुप्ता यांनी विजेच्या बचतीसाठी एक विशेष अभियान राबविले. या अभियानात ५.१३ कोटी रुपयांच्या विजेची बचत करण्यात आली. यात लोकोपायलट, सहायक लोकोपायलट, शंटर्स यांनी मोलाची कामगिरी बजावली. रेल्वेच्या ‘टीआरओ’ विभागाने त्यांना मे महिन्यात ऊर्जेची बचत करण्याबाबतची एक छोटी पुस्तिका दिली. या पुस्तिकेत विजेची बचत करण्यासाठी काय करावे याची मुद्देसूद माहिती होती. त्यानुसार संबंधित कर्मचाऱ्यांनी वाटचाल करून विजेची बचत केली. अनेकदा रेल्वेगाडीला सिग्नल न मिळाल्यामुळे आऊटरवर वाट पाहत उभे राहावे लागते. अशा वेळी इंजिन बंद ठेवल्यास विजेची मोठी बचत होऊ शकते या बाबीवर या अभियानात लक्ष केंद्रित करण्यात आले. यात रेल्वेगाड्यांना वेळेवर सिग्नल देण्याकडे लक्ष पुरविण्यात आले. याशिवाय डायनॅमिक ब्रेकचा वापर करून विजेची निर्मिती करण्याला प्राधान्य दिल्यामुळे ही बचत करणे शक्य झाल्याचे मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने कळविले आहे. (प्रतिनिधी)
लोकोपायलटने वाचविली ५.१३ कोटींची वीज
By admin | Published: September 12, 2016 3:02 AM