नागपुरात काँग्रेस बाजी पलटवेल; रमेश चेन्नीथला आणि मुकुल वासनिक यांचा विश्वास
By कमलेश वानखेडे | Published: April 6, 2024 08:00 PM2024-04-06T20:00:37+5:302024-04-06T20:01:15+5:30
Nagpur Loksabha Election 2024: काँग्रेसचे नागपुरातील उमेदवार आ. विकास ठाकरे यांच्या प्रचारासाठी शनिवारी मध्य नागपुरात आयोजित जन आशीर्वाद यात्रेत सहभागी
नागपूर : नागपूरची लढाई ही देशाची लढाई आहे. येथूून देशात संदेश जातो. नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आहे. पण नागपुरातील मतदारांच्या मनात काँग्रेस आहे. नागपूर काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. नागपुरात यावेळी बाजी पलटेल व हा गड आम्ही नक्कीच जिंकू, असा विश्वास काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी व्यक्त केला.
काँग्रेसचे नागपुरातील उमेदवार आ. विकास ठाकरे यांच्या प्रचारासाठी शनिवारी मध्य नागपुरात आयोजित जन आशीर्वाद यात्रेत रमेश चेन्नीथला यांच्यासह अ. भा. काँग्रेसचे महासचिव मुकुल वासनिक सहभागी झाले. यावेळी चेन्नीथला म्हणाले, काँग्रेसला प्रतिसाद मिळत आहे हे पाहून भाजप धास्तावली आहे. त्यामुळेच काँग्रेस नेत्यांचे पुतळे जाळणे सुरू केले आहे. वासनिक म्हणाले, नागपुरात काँग्रेसला चांगला प्रतिसाद मिळत आहे. नागपूरकर देशाला आश्चर्याचा धक्का देतील, असे चित्र दिसतेय. राजकारणात द्वेष पसरविण्याचा भाजपचा हेतू आहे. लोकशाहीत अशा वृत्तीला थारा मिळू नये, असे आवाहन त्यांनी केले.
यात्रेची सुरुवात भारतमाता चौक येथून झाली. गोळीबार चौक, टिमकी, तीनखंबा, पाचपावली, तांडापेठ, विणकर कॉलनी, बन्सोड चौक, मस्कासाथ, बंगाली पंजा, पिली मारबत चौक मार्गे कुंभारपुरा येथे समारोप झाला. यात्रेत विदर्भ प्रभारी आशिष दुआ, माजी मंत्री अनीस अहमद, अ. भा. काँग्रेसचे सचिव रामकिशन ओझा, प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे, व्यापारी आघाडीचे प्रदेश अध्यक्ष अतुल कोटेचा, प्रवक्ते अतुल लोंढे, विशाल मुत्तेमवार, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव बंटी शेळके, डॉ. राजू देवघरे, नंदा पराते यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले.