लोणार सरोवर वर्ल्ड हेरिटेज साईट होणार; हायकोर्टात माहिती, पुरातत्व विभागाला मागितले उत्तर
By राकेश पांडुरंग घानोडे | Published: January 24, 2024 07:17 PM2024-01-24T19:17:16+5:302024-01-24T19:17:36+5:30
बुलडाणा जिल्ह्यातील लोणार सरोवराचे जतन, संवर्धन व विकासाकरिता न्यायालयाने स्वत:हून जनहित याचिका दाखल करून घेतली आहे.
नागपूर: रामसर पाणथळ स्थळाचा दर्जा मिळालेल्या आणि व्यापक वैज्ञानिक संशोधनाला वाव असलेल्या जगप्रसिद्ध लोणार सरोवराला वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा मिळावा, यासाठी भारतीय पुरातत्व विभागाद्वारे प्रस्ताव तयार केला जात आहे, अशी माहिती बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाला देण्यात आली. त्यानंतर न्यायालयाने भारतीय पुरातत्व विभागाला यासह लोणार सरोवर संवर्धनावर येत्या ७ फेब्रुवारीपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.
बुलडाणा जिल्ह्यातील लोणार सरोवराचे जतन, संवर्धन व विकासाकरिता न्यायालयाने स्वत:हून जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. त्यावर न्यायमूर्तिद्वय नितीन सांबरे व अभय मंत्री यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, या प्रकरणातील न्यायालय मित्र ॲड. एस. एस. सन्याल यांनी ही माहिती दिली. राज्य सरकारने लोणार सरोवर संवर्धन आराखड्याकरिता ३६९ कोटी रुपये दिले आहेत. या आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी अमरावती विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली लोणार सरोवर संवर्धन समिती स्थापन करण्यात आली आहे.
काय असते वर्ल्ड हेरिटेज
काही स्थळांना विशेष सांस्कृतिक व भौगोलिक महत्व असते. विश्व संस्कृती टिकविण्यासाठी अशा स्थळांचे संरक्षण करणे आवश्यक असते. त्यामुळे युनेस्को (युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक ॲण्ड कल्चरल ऑर्गनायझेशन )च्या वर्ल्ड हेरिटेज कमेटीद्वारे अशी वने, पर्वत, सरोवर, द्विप, वाळवंट, स्मारक, इमारती, कॉम्प्लेक्स, शहरे इत्यादीला वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा दिला जातो. कमेटी या स्थळांची देखरेख करते. विशिष्ट परिस्थितीत या स्थळांना आर्थिक सहकार्यही केले जाते.