राकेश घानोडे।नागपूर : बुलडाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवरातील पाणी हॅलोअर्चिया सूक्ष्मजीवामुळे गुलाबी झाल्याचा अहवाल पुणे येथील आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूटने दिला आहे. या अहवालाचा तपशील ‘लोकमत’ला प्राप्त झाला आहे.हॅलोअर्चिया सूक्ष्मजीवाला खारे व आम्लयुक्त पाणी फार आवडते. अशा गुणधर्माचे पाणी मिळाल्यानंतर त्यांची झपाट्याने वाढ होते. यावर्षी उष्णतेमुळे
पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन झाले. परिणामी, खारेपणा व आम्ल नेहमीच्या तुलनेत अधिक वाढले. त्यातून हॅलोअर्चिया सूक्ष्मजीवाला पोषक वातावरण निर्माण होऊन त्यांची संख्या झपाट्याने वाढली. हे सूक्ष्मजीव तीव्र सूर्यकिरणापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी बेटा कॅरोटीन हे गुलाबी रंगद्रव्य मोठ्या प्रमाणात निर्माण करतात. त्यामुळे लोणार सरोवरातील हिरव्या पाण्याचा रंग अचानक बदलून गुलाबी झाला, असे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.फ्लेमिंगो पक्षी गेल्यावर्षी लोणार सरोवरात आले होते. हे सूक्ष्मजीव फ्लेमिंगो पक्ष्यांच्या पंखांमध्ये जिवंत राहू शकतात. त्यांच्या माध्यमातून या सूक्ष्मजीवांचा लोणार सरोवरामध्ये प्रवेश झाला असावा, असे गृहितक अहवालात मांडण्यात आले आहे.इराणमधील सरोवरही झाले होते गुलाबीया सूक्ष्मजीवांमुळे इराण येथील उमरिया सरोवरातील पाणीहीगुलाबी झाले होते, अशी माहिती राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली आहे. आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूटने उच्च न्यायालयाच्या आदेशावरून सदर अहवाल दिला आहे.