नागपूर : राज्याचे माजी मंत्री सुनील केदार मुख्य आरोपी असलेल्या नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील १२५ कोटी रुपयांच्या सरकारी रोखे खरेदी घोटाळा खटल्यावरील बहुप्रतिक्षित निर्णय पुन्हा लांबला. अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी ज्योती पेखले-पूरकर यांनी मंगळवारी या निर्णयाकरिता १८ डिसेंबर ही तारीख दिली.
खटल्यावर गेल्या २१ नोव्हेंबर रोजी अंतिम सुनावणी पूर्ण झाली. त्यानंतर न्यायालयाने २८ नोव्हेंबर रोजी निर्णय जाहीर केला जाईल, असे सांगितले होते. तसेच, या तारखेला सर्व आरोपींनी न्यायालयात हजर राहावे, असा आदेश दिला होता. त्यानुसार, न्यायालयाने मंगळवारी सकाळी ११.३० वाजता सर्व आरोपींच्या हजेरीची माहिती घेतली. त्यावेळी, एक आरोपी काही कारणांमुळे गैरहजर होता. परिणामी, न्यायालयाने निर्णयासाठी दुपारी १ वाजताची वेळ दिली. त्यानंतर न्यायालयाने दुपारी १.३० च्या सुमारास निर्णय पुढे ढकलण्यात येत असल्याचे सांगितले व सायंकाळी या निर्णयासाठी १८ डिसेंबर ही पुढची तारीख दिली. हा घोटाळा झाला त्यावेळी केदार बँकेचे अध्यक्ष होते. २००१-२००२ मध्ये होम ट्रेड लिमिटेड मुंबई यासह इतर चार कंपन्यांकडून बँकेच्या रकमेतून १२५ कोटी रुपयांचे सरकारी रोखे खरेदी करण्यात आले होते. त्यानंतर या कंपन्यांनी सरकारी रोखे दिले नाही व बँकेची रक्कमही परत केली नाही, असा आरोप आहे.