आरक्षण परिषद : सुखदेव थोरात यांचे रोखठोक मत नागपूर : आरक्षणाचा आधार हा आर्थिक नसून सामाजिक असमानता आहे. भारतात ही असमानता जातीशी संबंधित आहे आणि जातीव्यवस्था ही धर्माशी संबंधित असल्याने ती घट्ट चिकटून बसलेली आहे. त्यामुळे समाजात अजूनही जातीभेद पाळला जातो. हा जातीभेद नष्ट झाला तरच असमानता दूर होऊ शकते. त्यामुळे समाजात जोपर्यंत जातीभेद आहे तोपर्यंत आरक्षण हवेच, असे रोखठोक मत इंडियन कौन्सिल फॉर सोशल सायन्सेस अॅण्ड रिसर्च नवी दिल्लीचे चेअरमन डॉ. सुखदेव थोरात यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र आॅफिसर्स फोरमतर्फे डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात रविवारी आयोजित आरक्षण परिषदेचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. फोरमचे संस्थापक अध्यक्ष ई.झेड. खोब्रागडे अध्यक्षस्थानी होते तर फुले-आंबेडकरी विचारवंत प्रा. हरी नरके व प्रा. देवीदास घोडेस्वार हे प्रमुख अतिथी होते. डॉ. थोरात म्हणाले, सर्वच समाजात गरीब लोक आहेत. गरिबीचे कारण जवळपास सारखेच आहे. परंतु अस्पृश्य समाजातील लोकांच्या गरिबीचे कारण आणि प्रश्न मात्र जातीशी संबंधित आहेत. खासगी क्षेत्रातील परिस्थिती अतिशय वाईट आहे. खासगी क्षेत्रातील नोकर भरतीमध्ये सर्वाधिक जातीभेद पाळला जातो. त्यामुळे खासगी क्षेत्रात आरक्षण लागू करावे, ही मागणी लावून धरण्याची गरज आहे. यासोबतच दलितांच्या स्वतंत्र वसाहती, स्वतंत्र मतदार संघ आणि हजारो वर्षांपासून ज्या समाजाचे अधिकार नाकारण्यात आले, त्या समाजाला नुकसान भरपाई देण्याची मागणी पुढे रेटण्याची आवश्यकता असल्याचेही डॉ. थोरात म्हणाले. ई.झेड. खोब्रागडे यांनी आरक्षणाचे धोरण व अंमलबजावणीचा आढावा मागण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. प्रा. घोडेस्वार यांनी संविधान सभेतील आरक्षणावरील चर्चेवर प्रकाश टाकला. शिवदास वासे यांनी संविधान प्रास्ताविकेचे वाचन केले. टी.बी. देवतळे यांनी प्रास्ताविक, सच्चिदानंद दारुंडे यांनी संचालन तर विलास सुटे यांनी आभार मानले. राजरतन कुंभारे, ललित खोब्रागडे, डॉ. अनिल हिरेखण आदींनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)
जोपर्यंत जातीभेद तोपर्यंत आरक्षण
By admin | Published: September 28, 2015 3:14 AM