नागपूर : जळालेल्या रुग्णांवर तातडीने विशेष उपचार मिळाल्यास वाचण्याची शक्यता कित्येक पटीने वाढते. परंतु पूर्व विदर्भातील पाचही जिल्ह्यांत जळीत रुग्णांसाठी विशेष सोय नाही. रुग्णांना लांब अंतर कापून मेडिकलमध्ये उपचारासाठी यावे लागते. हे अंतरच या रुग्णांसाठी मृत्यूचे कारण ठरत आहे. नागपूर मेडिकल प्लास्टिक सर्जरी विभागाने केलेल्या अभ्यासात मेडिकलमध्ये ५० ते १०० पेक्षा जास्त किलोमीटर अंतर कापून आलेल्या २१८ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे पुढे आले.
वाढते शहर व औद्योगिकीकरणामुळे आगीच्या घटना वाढल्या आहेत. जखमी रुग्णांना विशेष उपचाराची व देखभालीची गरज असते. परंतु नागपूर सोडल्यास पूर्व विदर्भातील भंडारा, वर्धा, गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये आवश्यक सोयी नाहीत. अनेक रुग्णांना ५० व त्यापेक्षा जास्त किलोमीटर अंतर कापून उपचारासाठी नागपूरचे मेडिकल गाठावे लागते. हे अंतरच रुग्णांसाठी घातक ठरत आहे.
-३० ते ६० वयोगटात सर्वाधिक मृत्यू
अभ्यासात असेही दिसून आले की, जळालेले ६ ते १२ वर्षे वयोगटातील १५३ रुग्ण बरे झाले व ३१ रुग्णांचा मृत्यू झाला. १२ ते ३० वयोगटातील १९९ रुग्ण बरे झाले व १०३ रुग्णांचा मृत्यू झाला. ३० ते ६० वयोगटातील २०५ रुग्ण बरे झाले व ११९ रुग्णांचा मृत्यू झाला तर, ६० वयोगटावरील ४४ रुग्ण बरे होऊन ६९ रुग्णांचा मृत्यू झाला.
-मृत्यूमध्ये महिलांचे प्रमाण सर्वाधिक
डॉ. पाटील म्हणाले, अभ्यासात जळितांमध्ये बालके व पुरुषांच्या तुलनेत महिलांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे आढळून आले. शिवाय मृत्यूमध्येही महिलांचे प्रमाण मोठे होते. मेडिकलमध्ये २०१६ ते २०१९ या वर्षांत १२ वर्षाखालील २२१ बालके आली, यातील ३१ बालके दगावली. याच वर्षांत ३०४ पुरुष उपचारासाठी आले असताना ७६ मृत्यू, तर ३९८ महिला उपचारासाठी आले असताना यातील १९५ महिलांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.
- अभ्यासातील धक्कादायक वास्तव
मेडिकलच्या प्लास्टिक सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. सुरेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनात २०१६ ते २०१९ या वर्षात विविध जिल्ह्यातून मेडिकलमध्ये उपचारासाठी आलेल्या जळीत रुग्णांचा अभ्यास करण्यात आला. यात १०० पेक्षा जास्त किलोमीटर अंतर कापून मेडिकलमध्ये आलेल्या १७० रुग्णांचा, ५० ते १०० किलोमीटर अंतरावरून आलेल्या ४८ रुग्णांचा तर १० ते ५० किलोमीटर अंतरावरून आलेल्या ३९ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले.
-किलोमीटर व मृत्यू
*अंतर : भरती रुग्ण : मृत्यू*
- १० किमी. : २६३ : ६५
- १० ते ५० किमी : १४३ : ३९
- ५० ते १०० किमी : १४५ : ४८
- १०० किमी व वरील : ३५४ : १७०
- वयोगटानुसार मृत्यूची संख्या
*वयोगट : बरे झालेले रुग्ण : मृत्यू*
- १२ वर्षांपर्यंत : १५३ : ३१
- १२ ते ३० वर्षे : १९९ :१०३
- ३० ते ६० वर्षे : २०५ : ११९
- ६० व त्यावरील : ४४ : ६९
-उपचारात उशीर, मृत्यूचे मुख्य कारण
जळाल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. अशा रुग्णांवर डॉक्टरांच्या देखरेखीखाली मोठ्या प्रमाणात सलाइन द्यावे लागतात. लांब अंतरावरून मेडिकलमध्ये आलेल्या रुग्णांचा अभ्यास केला असता, बहुसंख्य रुग्णांच्या शरीरातील पाण्याची पातळी खूपच कमी झाल्याचे दिसून आले. दुसरे म्हणजे, प्रवासामुळे उपचारात होत असलेला उशीर, हे दोन्ही कारण मृत्यूला कारणीभूत ठरल्याचे आढळून आले.
-डॉ. सुरेंद्र पाटील, विभागप्रमुख, प्लास्टिक सर्जरी विभाग