युवक काँग्रेसच्या निवडणुकीसाठी युवा नेत्यांच्या पडताहेत उड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2021 11:33 AM2021-11-03T11:33:32+5:302021-11-03T11:38:56+5:30
सोमवारी समाप्त झालेल्या नामांकन प्रक्रियेत संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष व महासचिव पदासोबतच शहराध्यक्ष पदासाठी बंपर अर्ज प्राप्त झाले. प्रदेशाध्यक्ष पदासाठी २३, तर महासचिव पदासाठी तब्बल १९६ अर्ज आले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : युवक काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकीसाठीची उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सोमवारी संपली. या निवडणुकीसाठी युवा नेत्यांनी मैदानात उड्या घेतल्या असून प्रदेशाध्यक्ष पदासाठी २३, तर महासचिव पदासाठी तब्बल १९६ अर्ज आले आहेत. ३ नोव्हेंबरला अर्जांच्या छाननीनंतर उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येईल.
नामांकनाबाबत आक्षेप नोंदविण्याची मुदत २ नोव्हेंबरला समाप्त झाली. ३ नोव्हेंबरला अर्जांच्या छाननीनंतर १२ नोव्हेंबर ते १२ डिसेंबरदरम्यान सदस्यता अभियान राबविण्यात येईल. सदस्य बनताच ऑनलाइनरीत्या प्रदेश अध्यक्ष, महासचिव, शहर अध्यक्ष, महासचिव व ब्लॉक अध्यक्ष असे पाच मत द्यावे लागणार आहे. सदस्यता अभियानानंतर दिल्लीवरून निकालाची घोषणा केली जाईल.
या निवडणुकीसाठी मोठ्या संख्येने दावेदार पुढे आले आहेत. अध्यक्षपदासाठी २३ नामांकन असून, यात नागपूरचे कुणाल राऊत यांचा समावेश आहे. दुसऱ्या ते सहाव्या क्रमांकाची मते प्राप्त करणाऱ्या उमेदवाराला उपाध्यक्ष बनविण्यात येईल. महासचिव पदासाठी विक्रमी १९६ अर्ज प्राप्त झाले आहेत. शिवानी वडेट्टीवार यांनी अध्यक्ष पदासोबतच महासचिव पदासाठीही अर्ज सादर केल्याची माहिती पुढे आली आहे. युवक काँग्रेसच्या सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. वी. श्रीनिवास यांनी दावेदारांना दिल्लीला आमंत्रित करून त्यांच्या क्षमतेची पडताळणी केली. त्यांच्याच निर्देशानुसार जवळपास पाच दावेदारांनी आपले अर्ज परत घेतले आहे.
नागपूर शहराध्यक्षसाठी ५३, ग्रामीणसाठी ३५ दावेदार
प्रदेश अध्यक्षपदासोबतच नागपूर शहर कार्यकारिणीसाठीही जोर लावला जात आहे. नागपूर शहराध्यक्ष पदासाठी ५३ दावेदार पुढे आले आहेत. प्रदेशाप्रमाणेच येथेही सर्वात जास्त मत प्राप्त करणारा उमेदवार अध्यक्ष बनेल. त्यानंतरचे मत प्राप्त करणाऱ्या पाच उमेदवारांना उपाध्यक्ष बनविले जाईल. वर्तमान शहराध्यक्ष तौसिफ खान यांच्यासह रौनक चौधरी, तेजस जिचकार, अक्षय घाटोळे आदीही मैदानात आहेत. ग्रामीण अध्यक्ष पदासाठीही ३५ उमेदवारांनी दावा केला आहे.