आनंद डेकाटे
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जगभरातील बौद्धांचे व मानवतावाद्यांचे श्रद्धास्थान असलेल्या बुद्धगया स्थित महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन व स्वामित्व भारतीय बौद्धांकडे सोपविण्यात यावं आणि अनेक वर्षांपासून गैरबौद्धांच्या ताब्यात असलेले महाबोधी महाविहाराची मुक्ती करावी, या मागणीसाठी आता लॉंगमार्च काढण्यात येणार असल्याची घोषणा पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी गुरूवारी येथे पत्रकार परिषदेद्वारा केली.
प्रा. जोगेंद्र कवाडे म्हणाले, महाबोधी महाविहार मुक्तीसाठी जगभरामध्ये आंदोलने सुरू आहेत. बुद्धगयेमध्ये शेकडो बौद्ध भिक्खू उपोषण आंदोलन करीत आहेत. त्यांच्या पोलिसांची दडपशाही सुरू आहे. त्यामुळे पंतप्रधांन नरेंद्र मोदी यांनी स्वत: यात जातीने लक्ष घालावे. महाबोधी महाविहार हा बौद्धांचा अस्मितेचा प्रश्न आहे. त्यामुळे तो सोडवण्यासाठी आता आम्ही लॉंगमार्च काढणार आहोत. १२ मे रोजी बुद्धजयंतीच्या दिवशी बुद्धगया येथून या मार्चला सुरूवात होईल. हा मार्च पूर्णपणे शांती मार्च असेल. पटना येथे याचा समारोप होईल. जवळपास १५ दिवस हा चालेल. पटणा येथे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना भेटून त्यांना यासंदर्भात निवेदन सादर केले जाईल, असे त्यांनी सांगितले.
पत्रपरिषदेला कैलास बोंबले अजय चव्हाण, दिलीप पाटील, बाबा बोरकर, भीमराव कळमर, विजय पाटील आदी प्रामुख्याने उपस्थित होते.