इस्रायल शीटने डोमचे बांधकाम : पार्किंग व्यवस्थेत फेरबदल आनंद शर्मा नागपूर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल इमारतीसमोर वाहनांच्या पार्किंगसंदर्भात अनेक वाद समोर आले आहेत. अशा स्थितीत प्रवाशांसाठी मिहान इंडिया लिमिटेडने टर्मिनल इमारतीसमोरील परिसराचा कायापालट करून कव्हर्ड पार्किंग शेड तयार केले आहे. हे काम गत सहा महिन्यांपासून सुरू असून पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. लवकरच लोकार्पण होणार आहे.(प्रतिनिधी) वाहनांच्या ये-जाकरिता वेगळे मार्ग परिसराचा कायापालट करताना टर्मिनल इमारतीसमोरच भव्य डोम उभारण्यात आले आहे. यासह एक कव्हर्ड पार्किंग शेड आणि गाड्यांच्या ये-जाकरिता दोन वेगवेगळे मार्ग बनविण्यात आले आहेत. त्यावर शेड तयार केले आहे. एवढेच नव्हेत तर आसपासच्या खुल्या जागेत सुंदर लँडस्केपिंग केली असून विविध झाडांची रोपे लावण्यात आली आहेत. परिसरात तीन हॉटेल, आईस्क्रीम पार्लर आणि ट्रॅव्हल तिकीट एजंटची व्यवस्था केली आहे. पॉलीकार्बोनेट शीटचा वापर मोठ्या आकाराच्या राऊंड एमएस पाईपद्वारे जवळपास ७० हजार चौरस फूट जागेत रचना केली आहे. इस्रायल येथून पॉलीकार्बोनेट शीट मागविण्यात आली. या शीटमधून अल्ट्राव्हायलेट किरणे फिल्टर होऊन आत येत असल्यामुळे शीटच्या खाली उभे राहिल्यास थंडावा जाणवतो. दिल्ली, मुंबई, इंदूर, अहमदाबादच्या विमानतळावर अशाच प्रकारचे बांधकाम केल्याची माहिती आहे. या कामासाठी चार कोटींचे कंत्राट हैदराबाद येथील स्काय शेड कंपनीला दिले आहे. त्याचे आर्किटेक्ट अशफाक अहमद आणि शैलेंद्र मौर्य हे स्ट्रक्चरला डिझायनर आहेत. नागपुरात पहिल्यांदा अशा प्रकारचे बांधकाम झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. जाण्याच्या मार्गावर नि:शुल्क प्रवेश टर्मिनल इमारतीसमोरील मार्ग आठ ‘लेन’ आहेत. त्यापैकी सुरुवातीचे दोन ‘लेन’ आकस्मिक आणि व्हीआयपीकरिता आहेत. त्यानंतरचे तीन ‘लेन’ प्रवाशांच्या वाहनांना उभे करण्यासाठी आहेत. या जाण्याच्या मार्गावर वाहनांना प्रवेश नि:शुल्क आहे. वाहन येताच प्रवासी सामानासह उतरतील आणि वाहन लगेचच टर्मिनल इमारत परिसरातून बाहेर जाईल. या प्रकारे पुढील तीन ‘लेन’ प्रिमियम पार्किंगसाठी आहेत. येथे विमानाने येणाऱ्या वा जाणाऱ्या प्रवाशांना वाहने पार्क करता येतील. १५ मिनिटे पार्किंगसाठी ३०० रुपये शुल्क द्यावे लागेल. प्रवाशांच्या सुविधांवर भर गेल्या काही वर्षात नागपूर विमानतळावर प्रवाशांच्या संख्येत १७ ते १८ टक्के वाढ झाली आहे. या उपलब्धीमुळे नागपूर विमानतळाचा देशाच्या प्रमुख विमानतळाच्या श्रेणीत समावेश झाला आहे. त्यामुळे टर्मिनल इमारतीच्या परिसरात वाहनांची कोंडी दूर करण्यासाठी आवश्यक बांधकाम करण्यात येत आहे. प्रीमियम पार्किंगमध्ये ३०० रुपये शुल्क आकारण्याचा विचार आहे. विमान प्रवाशांना उत्तम सुविधा प्रदान करण्याचा उद्देश आहे. - ए. आबिद रुही, महाव्यवस्थापक (प्रोजेक्ट), मिहान इंडिया लिमिटेड.
विमानतळ परिसराचा ‘लूक’ बदलतोय
By admin | Published: March 18, 2017 3:01 AM