लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘बंदगीच माझी सलामीची होती, जिंदगीच माझी गुलामीची होती, तोडलीस माझी गुलामीची बेडी, अशी भीमराया तुझी साथ होती...’ महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वर्णन करायला शब्दही अपुरे पडावे. अनेक साहित्यिक, कवी, गायक व असंख्य कलावंतांनी आपापल्यापरीने ते मांडण्याचा प्रयत्न केला. हिंदी चित्रपट संगीतातील एक तारा असलेल्या रामलक्ष्मण यांच्या संयोजनातून सादर ‘एक रात्र निळ्या पाखरांची’ या कार्यक्रमातून बाबासाहेबांच्या कर्तृत्वाचा संगीतमय प्रवास नागपूरकरांनी अनुभवला. ‘आज उजळे बघा धरती, बुद्ध-भीमाच्या प्रकाशाने...’ या कवी वामनदादा कर्डकांच्या शब्दातील संगीतमय रूपातून ‘निळ्या पाखरांच्या’ भावना व्यक्त झाल्या.हिंदी चित्रपट संगीताचा स्वर्णिम काळ ओसरत असताना नागपूरच्या रामलक्ष्मण यांनी मधूर संगीतातून रसिकांवर पुन्हा गारुड केले. त्याच रामलक्ष्मण यांनी काही वर्षांपूर्वी नागपुरात ‘एक रात्र निळ्या पाखरांची’ हा कार्यक्रम सादर केला होता. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार ‘खासदार सांस्कृतिक महोत्सवा’त मंगळवारी त्या कार्यक्रमाच्या स्मृतींना पुन्हा एकदा उजाळा मिळाला. रामलक्ष्मण वयाने थकले असताना त्यांचा मुलगा अमर रामलक्ष्मण यांनी कार्यक्रमाची धुरा सांभाळली. नागपूरचे संगीत गुरू सूरमणी पं. प्रभाकर धाकडे यांची साथ त्यांनाही लाभली. कार्यक्रमात विविध गीतातून डॉ. आंबेडकरांच्या महान कार्याला संगीतमय उजाळा देण्याचा प्रयत्न कलावंतांनी केला. भलेही तुम्ही संस्कृतीचे गोडवे गा, पण जातीपातीच्या चिखलात पडलेल्या भारताची अवस्था राजा ढालेंच्या शब्दात ‘येथे वसे न समता, येथे न बंधूभाव, रे उच्चनीचतेचा येथे समूळ ठाव...’ अशी होती. राजा ढाले यांची रचना असलेले ‘उजळून टाक बुद्धा दाही दिशा मनाच्या, बदलून टाक सारख्या वाटा युगायुगाच्या...’ हे गीत हेमलता पोपटकर यांनी सादर केले. बाबासाहेबांच्या अनुयायांना ‘निळे पाखर’ही संबोधले जाते. प्रसिद्ध गायक एम. ए. कादर व त्यांच्या पत्नी झीनत कादर यांनी ‘डॉ. आंबेडकरांच्या अनुयायांची, एक रात्र निळ्या पाखरांची...’ या गीताने कार्यक्रमाला सुरुवात केली. त्यानंतर गायक शशिकांत व स्वाती यांनी ‘भीमायण गातो आम्ही आता...’ सादर करून ‘मुक्तिदूत अन् शांती उपासक, मानवतेचा प्रबुद्ध नायक’ असलेल्याबाबासाहेबांच्या भीमायणाला सुरुवात केली. पं. धाकडे गुरुजी यांचे संगीत असलेल्या ‘हे बुद्धा हे बुद्धा चित्ताने परी शुद्धा...’ हे गाणे गायिका अहिंसा तिरपुडे यांनी सादर केले.अस्पृश्यतेच्या विपन्नावस्थेत पिचलेल्या समाजाचा काळोख भीमाच्या जन्माने संपल्याचे वर्णन गायिका मोहिनी बरडे यांनी ‘काळोख संपला संपून गेली रात्र, उठ मानवा जागा हो निमिषात...’ या गीतातून केले. प्रसिद्ध गायक निरंजन बोबडे यांनी ‘उत्तुंग व्यक्तिमत्त्वाला विविधांगी पैलू होते, बाबांचे समग्र जीवन देशास समर्पित होते...’ सादर केले. निरंजन याने यानंतर युवा गायिका आकांक्षासोबत ‘प्रबुद्ध भारत का एक सपना बाबाने देखा था...’ सादर केले. गायिका छाया वानखेडे यांनी ‘माझ्या भीमाच्या नावाचे कुंकू लाविले रमाने...’ हे गाणे सादर करून श्रोत्यांना उत्साहित केले. गायक अनिल खोब्रागडे यांनी ‘भारतीय घटनेचा तू शिल्पकार आहे...’ सादर करून उपस्थितांना भावविभोर केले. यानंतरही कलावंतांनी कार्यक्रमासाठी आलेल्या रसिकांना प्रत्येक सादरीकरणाने मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचे निवेदन ज्येष्ठ पत्रकार बाळ कुळकर्णी व रेणुका देशकर यांनी केले.कार्यक्रमाच्या वेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह राज्याचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, माजी मंत्री व अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्य अॅड. सुलेखा कुंभारे, आ. अनिल सोले, आ. मिलिंद माने, आ. नाना शामकुळे, गिरीश गांधी, धर्मपाल मेश्राम, संदीप गवई, संदीप जाधव, जयप्रकाश गुप्ता आदी मान्यवर उपस्थित होते.मान्यवरांचा गडकरींच्या हस्ते सत्कारकार्यक्रमाच्या वेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते साहित्य व कला क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये डॉ. जुल्फी शेख, राजेश बुरबुरे, मंगलदीप बँड पार्टीचे लहानू इंगळे, संगीतकार भूपेश सवाई, तबलावादक संदेश पोपटकर, कवी हृदय चक्रधर, नाटककार प्रभाकर दुपारे, गायक अनिल खोंब्रागडे, अभिनेता अशोक गवळी, मंजुषा सावरकर, डॉ. गणेश चव्हाण, विनायक तुमाराम, चंद्रकांत वानखडे, नरेश साखरे, राजा करवाडे आदींचा समावेश होता..
आज उजळे बघा धरती, बुद्ध-भीमाच्या प्रकाशाने...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 11:57 PM
‘आज उजळे बघा धरती, बुद्ध-भीमाच्या प्रकाशाने...’ या कवी वामनदादा कर्डकांच्या शब्दातील संगीतमय रूपातून ‘निळ्या पाखरांच्या’ भावना व्यक्त झाल्या.
ठळक मुद्दे‘निळ्या पाखरां’च्या भावनांची रात्र : खासदार सांस्कृतिक महोत्सव