निशांत वानखेडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ऑगस्ट महिन्यात आकाशात ताऱ्यांची आतषबाजी पाहण्याची संधी आहे. येत्या ११, १२ व १३ ऑगस्ट राेजी मध्यरात्री ते पहाटेपर्यंत नागरिकांना या नैसर्गिक फटाक्यांच्या रंगीबेरंगी आतषबाजीचा नजारा बघायला मिळेल. या तीन दिवसांत पर्सिड्स उल्कांचा वर्षाव हाेणार असून यावर्षीचा सर्वांत माेठा उल्का वर्षाव मानला जात आहे. हे दृश्य यानंतर १३३ वर्षांनंतर म्हणजे २१२६ सालीच दिसेल.
अंतराळात दरराेज असंख्य घडामाेडी घडत असतात. त्यातीलच ही एक. रमण विज्ञान केंद्राचे खगाेलशास्त्र शिक्षक महेंद्र वाघ यांनी याबाबत माहिती दिली. सूर्याभाेवती भ्रमण करणारा स्विफ्ट-टटल धूमकेतू सध्या पृथ्वीजवळून जात आहे. तब्बल २६ किलाेमीटर व्यास असलेला हा धूमकेतू प्रचंड वेगाने भ्रमण करीत आहे. सूर्याच्या जवळ असताना ताे पृथ्वीच्या कक्षेत असताे. हाच धूमकेतू पर्सिड उल्का शाॅवरचा जनक आहे. १७ जुलै ते २४ ऑगस्ट या काळात पृथ्वी स्विफ्ट टटल धूमकेतूच्या कक्षीय मार्गाच्या एकदम जवळून भ्रमण करीत आहे. यातील ११, १२ व १३ ऑगस्टला पृथ्वी या धूमकेतूच्या ढिगाऱ्यातून जाणार आहे. या धुमकेतूचे तुकडे पृथ्वीच्या वरच्या वातावरणात घुसतात. या धुमकेतूच्या तुकड्यांचा वेग २ लाख १० हजार किमी प्रति तास असताे. हे तुकडे रात्री वेगाने फिरणाऱ्या पर्सिड्स उल्कांसह प्रकाशमान हाेतात. दर मिनिटाला एक किंवा दाेन याप्रमाणे एका तासात ६० ते १३० रंगीबेरंगी उल्का पडताना दिसतील. शिवाय उल्का वर्षावामुळे धुमकेतूच्या ढिगाऱ्यातील तुकडे चमकतील आणि आकाशात आतषबाजी झाल्याचे चित्र दिसेल.
कुठे पाहता येईल?
- मध्यरात्रीपासून ते पहाटेपर्यंत पृथ्वीच्या काेणत्याही भागात.
- उत्तर ध्रुवावर उल्कांचा सर्वाेत्तम शाॅवर बघायला मिळेल.
- चंद्राची डार्क साइड असलेल्या भागात हे दृश्य अधिक चांगले दिसेल.
- निरभ्र आकाशाचा अधिकाधिक भाग दिसेल, अशा ठिकाणी बसा.
- अंधार राहील, याची काळजी घ्या. शक्यताे माेबाइल बंद ठेवा.