लोकमत न्यूज नेटवर्क
चुंचुडा (पश्चिम बंगाल) : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याच्या मतदानाअगोदर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राजकारणातील पुढील उद्दिष्ट काय राहणार आहे, यावर भाष्य केले. अगोदर आम्ही पश्चिम बंगालमध्ये विजय मिळवू व त्यानंतर दिल्लीच्या सत्तेवर नजर असेल, असे प्रतिपादन ममता यांनी केले. प्रचारसभेदरम्यान त्या बोलत होत्या.
यावेळी ममता यांनी स्वत:ची तुलना ‘रॉयल बंगाल टायगर'सोबत केली. मी एका पायाने बंगाल जिंकणार आणि दोन्ही पायांनी दिल्लीवर झेंडा फडकविणार, असा दावा ममता यांनी केला.
छत्तीसगड नक्षलवादी हल्ल्यावरून त्यांनी केंद्रावर टीका केली. भाजपाला देशात शासन करणे जमत नसल्याचे दिसून येत आहे. त्यांनी केवळ पश्चिम बंगालच्या निवडणुकांवर लक्ष्य केंद्रित केले आहे. भाजपाकडे सक्षम उमेदवार नसल्याने त्यांना खासदारांना मैदानात उतरावे लागले आहे. बंगालमधील निवडणुका चार टप्प्यात होऊ शकल्या असत्या. मात्र जाणूनबुजून टप्पे वाढविण्यात आले आहे, असा आरोप त्यांनी केला.
आता आमदार चूक करणार नाहीत
ममता बॅनर्जी यांनी चुंचुडा व सप्तग्राम येथील वर्तमान आमदार तपन मुजुमदार व तपन दासगुप्ता यांच्याकडून कामात चूक झाल्याची कबुली दिली. परंतु यानंतर आमचे आमदार चूक करणार नाही. जर हुगळी जिल्ह्यात आम्ही जिंकलो नाही तर अडचण वाढेल, असेदेखील त्या म्हणाल्या.