निशांत वानखेडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अंतराळ अभ्यासक आणि खगोलप्रेमींसाठी अनोखी पर्वणी सध्या चालून आली आहे. सूर्यमालेचे तीन ग्रह एकाच वेळी अवकाशात पाहण्याची संधी आहे. सूर्यास्तानंतर लगेच पश्चिमेकडे लक्ष दिल्यास दोन प्रकाशमय पिंड तुम्हाला दिसतील. पाहताना ताऱ्यांसारखे वाटत असले तरी ते तारे नसून गुरू आणि शनी ग्रह होत. पूर्वेकडे पाहिल्यास लाल रंगाचा पिंड तुम्हाला दिसेल, तो म्हणजे मंगळ. चंद्रदर्शन करताना या ग्रहांचेही नक्कीच अवलाेकन करा.
रमण विज्ञान केंद्रातील खगाेलशास्त्राचे शिक्षक महेंद्र वाघ यांनी अंतराळातील या महत्त्वपूर्ण घडामाेडीबाबत माहिती दिली. सूर्यमालेतील सर्व ग्रह सूर्याभाेवती फिरतात. सूर्याजवळ असले की ते दिसणे शक्य नसते. मात्र सध्या दिसणारे हे तीन ग्रह पृथ्वीच्या मागे आणि सूर्यापासून खूप दूर आहेत. दिवसा प्रकाशात पाहता येत नसले तरी सूर्यास्तानंतर उघड्या डाेळ्यानेही त्यांचे दर्शन हाेऊ शकते. विशेष म्हणजे गुरू आणि शनी ग्रह पुढच्या महिन्यापर्यंत अशाचप्रकारे आकाशात बघायला मिळणार आहे, तर मंगळ ग्रह पुढचे काही महिने तरी अशाप्रकारे दर्शन देईल. सध्या पूर्वेकडे दिसणारा मंगळ ग्रह हळूहळू पश्चिमेकडे सरकत जाईल आणि दिसेनासा हाेईल. या तीन ग्रहांसाेबत शुक्राचे दर्शनही आपल्याला करता येईल, पण त्यासाठी पहाटे उठून अवकाशात नजर फिरवावी लागेल. महेंद्र वाघ म्हणाले, अंतराळातील ही सामान्य घडामाेड आहे. पण खगाेलप्रेमी व विद्यार्थ्यांसाठी नक्कीच माेठी संधी म्हणता येईल.
दुर्बिणीतून पहा गुरूचे चार उपग्रह
उघड्या डाेळ्याने हे ग्रह प्रकाशमय ठिपके दिसत असले तरी टेलिस्काेपमधून त्यांचे खरे दर्शन आपल्याला हाेते. टेलिस्काेपने बघितल्यास गुरू ग्रहाचे गॅनिमीट, आयाे, युराेपा आणि कॅलिस्टाे या चार उपग्रहांचे स्पष्ट दर्शन आपल्याला हाेते. शनी ग्रहाभाेवती असलेली रिंगही तुम्ही टेलिस्काेपमधून पाहू शकता.
२३ नाेव्हेंबरपर्यंत बघा उल्कावर्षाव
अंतराळातील आणखी एक महत्त्वाची घडामाेड या काळात अनुभवली जाऊ शकते व ती म्हणजे उल्कावर्षाव. लिओनीड नावाच्या धूमकेतूद्वारे हा उल्कावर्षाव हाेत आहे. १३ नाेव्हेंबरपासून हा उल्कावर्षाव सुरू झाला असून, ताे पुढे २३ नाेव्हेंबरपर्यंत चालणार असल्याचे महेंद्र वाघ यांनी सांगितले.