लाेकमत न्यूज नेटवर्क
कन्हान : चाेरट्याने तीन वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या शेतांत चाेरी करीत ९७ हजार रुपये किमतीचे विविध शेतीउपयाेगी साहित्य चाेरून नेले. यात बहुतांश इलेक्ट्रिक साहित्य आहे. ही घटना कन्हान (ता. पारशिवनी) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील वाघाेली शिवारात बुधवारी (दि. ३०) मध्यरात्री घडली असून, गुरुवारी (दि. १) सकाळी उघडकीस आली.
राकेश काकडे, रा. वाघाेली (ता. पारशिवनी) यांची वाघाेली शिवारात शेती असून, चाेरट्याने त्यांच्या शेतातील विहिरीजवळ लावलेले साैरऊर्जेचे संयंत्र (पॅनल), पाच अश्वशक्ती क्षमतेचा इलेक्ट्रिक माेटरपंप व ५० फूट केबल असे एकूण ५७ हजार रुपये किमतीचे साहित्य चाेरून नेले. राकेश काकडे यांच्या शेताला लागून लक्ष्मीकांत काकडे, रा. वाघाेली यांचे शेत आहे. चाेरट्याने त्यांच्या शेतातील पाच अश्वशक्ती क्षमतेचा इलेक्ट्रिक माेटरपंप व ५० फूट केबल असे एकूण ३७ हजार रुपये किमतीचे साहित्य लंपास केले. त्यानंतर चाेरट्याने आनंद काकडे, रा. वाघाेली यांच्या शेतातून २५ फूट केबल चाेरून नेली. त्या केबलची किंमत तीन हजार रुपये आहे. या तिन्ही घटनांमध्ये चाेरट्याने एकूण ९७ हजार रुपये किमतीचे साहित्य चाेरून नेल्याची माहिती पाेलिसांनी दिली. या प्रकरणी कन्हान पाेलिसांनी राकेश काकडे यांच्या तक्रारीवरून अज्ञात आराेपींविरुद्ध गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे.