नागरिक, व्यापारी हादरले : लुटारूच्या हल्ल्यात पेट्रोलपंप संचालक जखमी लोकमत न्यूज नेटवर्कवाडी/नागपूर : पेट्रोल पंपावरील व्यवहाराची जमा झालेली रोकड बँकेत जमा करण्यासाठी आलेल्या पेट्रोलपंप मालकावर जोरदार हल्ला करून लुटारूंनी १६ लाख ७५ हजारांची रोकड लुटून नेली. वाडीच्या डिफेन्स (आयुध निर्माणी) परिसरातील भारतीय स्टेट बँकेसमोर सोमवारी दिवसाढवळ्या ही खळबळजनक लुटमारीची घटना घडली. जगमलसिंग इंदराजसिंग यादव (६०, रा. दाभा) असे जखमी पेट्रोलपंप मालकाचे नाव असून, ते वायुसेनेचे निवृत्त अधिकारी आहेत. निवृत्तीनंतर त्यांनी बाजारगाव परिसरात पेट्रोलपंप सुरू केला आहे. डिफेन्स परिसरातील भारतीय स्टेट बँकेत त्यांचे खाते आहे. येथे ते किंवा त्यांचे कर्मचारी नियमित व्यवहाराची रोकड जमा करतात. शनिवारी आणि रविवारी पेट्रोल पंपावरील विक्रीतून मिळालेली रोकड बँकेत जमा करण्यासाठी ते सोमवारी सकाळी ११.१५ वाजताच्या सुमारास एचआर-५१/बीए-७९४४ क्रमांकाच्या कारने बँकेत आले होते. कारमधून खाली उतरून ते बँकेच्या प्रवेशद्वाराकडे जात असताना अचानक मागून मोटरसायकलवर आलेल्या तिघांपैकी एका लुटारूने त्यांच्या डोक्यावर हॉकी स्टीकने जोरदार प्रहार केला. त्यामुळे ते खाली कोसळले. ही संधी साधून लुटारूंनी त्यांच्याजवळील रोकड असलेली बॅग हिसकावून पळ काढला. यादव यांनी स्वत:ला सावरत कारने वाडी पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार नोंदविली.विशेष म्हणजे, स्वसुरक्षेसाठी त्यांच्याकडे परवानाप्राप्त पिस्तूल आहे. घटनेच्या वेळी त्यांनी हे पिस्तूल कारमध्येच ठेवल्याने लुटारू त्यांच्यावर हल्ला करून बिनदिक्कत पळून गेले. बँकेच्या परिसरात फारशी गर्दी नसल्यामुळे लुटारूंचे सहज फावले. या घटनेनंतर यादव यांना वायुसेनेच्या रुग्णालयात भरती करण्यात आले. दरम्यान, तक्रार मिळताच वाडी पोलिसांनी घटनास्थळ गाठून लुटारूंची माहिती मिळविण्याचे प्रयत्न केले. सूचना देऊन नाकाबंदीही केली. मात्र वृत्त लिहिस्तोवर पोलिसांना कोणताही धागादोरा गवसला नव्हता. माहिती कळताच परिमंडळ १ च्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, गुन्हे शाखेचे उपायुक्त संभाजी कदम यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी, कर्मचाऱ्यांचा ताफा वाडीत पोहोचला.सुरक्षा व्यवस्था नाहीडिफेन्सच्या भागातील ठिकठिकाणचा परिसर निर्जन आहे. भारतीय स्टेट बँकेच्या शाखेची निर्मिती २३ मार्च २००७ रोजी करण्यात आली. तेव्हापासून आजवर या बँकेच्या आवारात सुरक्षा रक्षकाची नियुक्ती करण्यात आली नाही. शिवाय, बँकेत व या मार्गावरील परिसरात कुठेही सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले नाही. बँक शाखेकडे जाणाऱ्या मार्गावर फारशी वर्दळ नसते. या परिसरात मोठ्या प्रमाणात झाडेझुडपे वाढली असल्याने असामाजिक तत्त्वांचा वावर वाढला आहे. बँक परिसरात किंवा मार्गावर सुरक्षेची साधने लावली असती तर यादव यांच्यावर हल्ला करणाऱ्या लुटारूंची महत्त्वपूर्ण माहिती पोलिसांना मिळाली असती.
वाडीत बँकेसमोर लुटमार, १६.७५ लाख पळविले
By admin | Published: May 23, 2017 1:36 AM