लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महागाईच दुखणं आज प्रत्येक सर्वसामान्याला सतावत आहे. दिवसेंदिवस वाढत जाणारी महागाईमुळे सर्वसामान्य माणसाचे बजेट कोलमडले आहे. खाद्यतेल असो की पेट्रोलचे दर, सगळ्याच गोष्टींचे दर महाग झाले आहेत. सर्वसामान्यांना आता दररोजचा खर्च करताना महिन्याचे नियोजन करणेही अवघड झाले आहे. त्यातच ब्रॅण्डेड कंपन्या खाद्यतेलाचे दर वाढवून लूट करीत आहे. पॅकिंग खाद्यतेलासाठी १६ ते २५ रुपये जास्त मोजावे लागत आहे.
महागाईमुळे गरीब व सामान्यांना खाद्यतेलाचे टीन (१५ किलो) घेणे शक्य नसल्याने बजेट पाहून लिटरचे पॅकेट घ्यावे लागते. सध्या किराणा दुकानांमध्ये खुले तेल मिळत नाही. त्यामुळे खुल्या तेलाच्या भावात ९१० ग्रॅमचे पॅकेज खरेदी करतात. एक किलो खुले आणि पॅकेजचे ९१० ग्रॅम तेलाचे दर समान आहेत. ब्रॅण्डेड तेल कंपन्या तेलाचे दर कमी करण्यास तयार नाही. कंपन्या भाववाढ करून सर्वसामान्यांची लूट करीत असल्याचे किराणा दुकानदारांनी सांगितले.
किलो व पॅकेटमध्ये ९० ग्रॅमचा फरक
सर्वाधिक विक्रीचे सोयाबीन तेलाचे दर १६२ ते १६५ रुपये किलो आहेत आणि ब्रॅण्डेड कंपन्यांच्या तेलाच्या पॅकेटचे दरही १६० ते १६५ रुपयांदरम्यान आहेत. ग्राहक विनायक कोल्हे म्हणाले, सध्या बाजारात खुले तेल मिळत नसल्याने दरवेळी सोयाबीनचे दोन पॅकेट विकत घेतो. किलो आणि पॅकेटच्या वजनात ९० ग्रॅमचा फरक आहे. त्याकरिता १६ ते २० रुपयापर्यंत जास्त पैसे मोजावे लागतात. हा भुर्दंड ग्राहकांवर बसू नये. कंपन्यांनाही किलोप्रमाणे पॅकबंद तेल विकण्याची सक्ती करावी. हीच बाब शेंगदाणा खाद्यतेलासाठी लागू असून, खुले आणि पॅकबंद तेलासाठी जवळपास २५ रुपयांपर्यंत जास्त पैसे द्यावे लागतात. सध्या बाजारात सोयाबीन तेल प्रति किलो १६२ ते १६५, शेंगदाणा १८० ते १८५, राईस ब्रान १८०, जवस १६५, सरसो १७० रुपये भाव आहेत.
पॅकेटवर वेगवेगळी एमआरपी
नागपूर चिल्लर किराणा संघाचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख म्हणाले, बाजारात स्थानिक आणि ब्रॅण्डेड कंपन्यांचे पॅकबंद खाद्यतेल उपलब्ध आहेत. सोयाबीन असो वा शेंगदाणा तेल, सर्व कंपन्यांची एमआरपी वेगवेगळी असते. अशावेळी नेहमीच्या ग्राहकांना पॅकेटचे दर कमी करून विक्री करावी लागते. पॅकेटचे दर जास्त असल्याने अनेकदा ग्राहक नाराज होतात. पण याकरिता आमचाही नाईलाज आहे. शासनाने याकडे लक्ष द्यावे.