सुनील चरपे
लाेकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : चालू खरीप हंगामाच्या ताेंडावर रासायनिक खत उत्पादक कंपन्यांनी खताचे दर दीडपटीपेक्षा अधिक वाढविल्याने एकीकडे शेतकऱ्यांचे आर्थिक नियाेजन बिघडले तर दुसरीकडे वाढीव दर पूर्ववत करण्यासाठी केंद्र शासनावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावर उपाय म्हणून केंद्र शासनाने खतांच्या सबसिडीत वाढ करण्याची व खतांचे दर पूर्ववत करण्याची घाेषणा केली. वास्तवात, बाजारात डीएपीचे दर स्थिर असून, ‘एनपीके’ (मिश्र खते) व ‘एनपीएस’(संयुक्त खते) श्रेणीतील खतांच्या किमती शासनाने जाहीर केलेल्या दराच्या तुलनेत थाेड्या अधिक असल्याचे आढळून आले आहे. खतांची चढ्या दराने विक्री हाेत असल्याने शेतकऱ्यांची लूट हाेत आहे. दुसरीकडे, खरीप पिकांना युरियाची फारसी गरज नसताना युरियाच्या मागणीत अनावश्यक वाढ झाल्याचेही दिसून आले.
इफकाे (इंडियन फार्मर्स फर्टीलायझर काे-ऑपरेटिव्ह लिमि.)ने डीएपी, एनपीके व एनपीएस श्रेणीतील खताचे दर २२ मे राेजी नव्याने जाहीर केल्या. इफकाेने एनपीके श्रेणीतील खताच्या किमती १,२७५ ते १,१८५ रुपये प्रति बॅग, एनपीएस श्रेणीतील खताच्या किमती ९७५ रुपये तर डीएपीच्या किमती १,२०० रुपये प्रति बॅग जाहीर केल्या आहेत. नागपूर शहरासह जिल्ह्यातील १३ तालुक्यांमधील काही महत्त्वाच्या कृषी सेवा केंद्रांचा आढावा घेतला असता, डीएपी (डायअनाेनियम फाॅस्फेट)ची विक्री १,२०० रुपये प्रति बॅगप्रमाणे केली जात असून, नरखेड, काटाेल, कळमेश्वर तालुक्यात डीएपीची विक्री १,२५० रुपये प्रति बॅगप्रमाणे केली जात असल्याचे निदर्शनास आले. कृषी विभागाच्या सूचनेवरूनही या किमती १,२०० रुपये केल्याचेही काही कृषी सेवा केंद्र संचालकांनी सांगितले.
जिल्ह्यात १०:२६:२६ ची विक्री १,१७५ ते १,३७५ रुपये दराने केली जात असून, २०:२०:०० ची विक्री १,०५० रुपये, १२:३२:१६ ची विक्री १,१७५ ते १,४०० रुपये, २४:२४:०० ची विक्री १,२८० ते १,४५० रुपये, २०:२०:००:१३ ची विक्री ९३० ते १,००० रुपये, १४:३५:१४ ची विक्री १,२७५ रुपये २४:००:०८ ची विक्री १,२३० रुपये तर सुपर फाॅस्फेट (दाणेदार)ची विक्री ४२० ते४५० रुपये आणि सुपर फाॅस्फेट (पावडर)ची विक्री ३९० ते ४१० रुपये प्रति बॅग दराने सुरू असल्याचेही आढळून आले आहे. यात डीएपीची विक्री प्रति बॅग ५० रुपये, एनपीके श्रेणीतील खताची विक्री १५० ते ३५० रुपये तर एनपीएस श्रेणीतील खताची विक्री ४५ ते ७० रुपये अधिक किमतीने केली जात आहे.
...
खताचे जुने दर नवीन दर सध्याचे दर
१) डीएपी -११८५ - १९०० - १२००
२) १०:२६:२६ -११७५ - १७७५ - १३७५
३) २०:२०:० -९७५ - १४०० - १०५०
४) १२:३२:१६ - ११९० - १७७५ - १४००
५) २४:२४:० - ९७५ - १४०० - १३५०
६) २०:२०:०:१३ - १००० - १३५० - १०००
७) १४:३५:१४ - -- - -- - १२७५
८) २४:००:०८ - -- - -- - १३१०
९) सुपर फाॅस्फेट - ४२० - ५०० - ४५०
...
एकूण खरीप लागवड क्षेत्र
४,७५,००० हेक्टर
...
शासनाने आधी केलेली खताची दरवाढ व नंतर घेतलेला यू टर्न शेतकऱ्यांसाठी घातक आहे. शासन खतासह इतर कृषी निविष्ठांच्या किमतीत वाढ करण्याला अप्रत्यक्षरित्या मदत करते. मात्र, त्या तुलनेत शेतमालाच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करून बाजारात भाव पडल्यावर ताे शेतमाल किमान आधारभूत किमतीने खरेदी करण्यास पुढाकार घेत नाही. त्यामुळे ही बाब शेतकऱ्यांसाठी धाेकादायक ठरते.
- मदन कामडे, शेतकरी, नरखेड.
....
शासनाने रासायनिक खतांच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेतला असला तरी शेतकऱ्यांना खते चढ्या दराने विकत घ्यावी लागतात. खते, बियाणी, कीटकनाशके यांच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक पिकाचा उत्पादन खर्च वाढत चालला आहे. शेतमालाला मात्र त्या तुलनेत भाव मिळत नाही. त्यामुळे दरवर्षी नुकसान सहन करावे लागते. या परिस्थितीत शेतीवर उपजीविका करणे कठीण झाले आहे.
- दिलावर कावळे, शेतकरी, टाकळघाट.
....
हा घ्या पुरावा
काही दुकानांमधून डीएपीची विक्री १,२०० रुपये प्रति बॅग तर काही दुकानांमधून १,२५० रुपये प्रति बॅग प्रमाणे केली जात आहे. यात शेतकऱ्यांना ५० रुपये प्रति बॅग अतिरिक्त माेजावे लागत आहेत. दाेन दिवसांपूर्वी डीएपीची विक्री १,४०० ते १,४७५ रुपये प्रति बॅगप्रमाणे करण्यात आली. डीएपी हे सर्वाधिक वापरले जाणारे खत असल्याने या खताचा काळाबाजार हाेण्याची शक्यता बळावली आहे.
...
मिश्र व संयुक्त खतांच्या किमती कमी करण्यात आल्या असल्या तरी त्याही खतांची विक्री चढ्या दराने केली जात आहे. शासनाने डीएपी व्यतिरिक्त अन्य खतांच्या कमी केलेल्या किमती जाहीर न केल्याने नेमके दर कळायला मार्ग नाही. खतांचे कंपनीनिहाय दर वेगवेगळे असल्याने तसेच त्याची माहिती शेतकऱ्यांना नसल्याने काही दुकानदार खतांची विक्री चढ्या दराने करण्याची शक्यता आहे.
...